डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील ठाकुरवाडी भागातील समर्थ जलाराम ज्योत या अधिकृत इमारतीच्या बाजुला कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता बनावट कागदपत्रांच्या आधारे तीन भूमाफियांनी जमीन मालकाच्या संगनमताने तीन वर्षापूर्वी साईतीर्थ आर्केड ही बेकायदा इमारत उभारली. या बेकायदा इमारत प्रकरणी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पालिकेने ही इमारत अनधिकृत घोषित करून भूमाफियांना ही बेकायदा इमारत स्वताहून भुईसपाट करण्याचे आदेश दिले होते.

तरीही भूमाफियांनी या पाच माळ्याच्या बेकायदा इमारतीची उभारणी केली म्हणून पालिकेच्या ह प्रभागाचे प्रभारी अधीक्षक अर्जुन वाघमारे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी ‘एमआरटीपी’चा गुन्हा दाखल केला आहे.

पालिकेच्या ह प्रभागातील अधीक्षक अरूण पाटील हे वैद्यकीय रजेवर आहेत. त्यामुळे लिपिक अर्जुन वाघमारे यांनी साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्या सूचनेवरून ही तक्रार विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियमाने (एमआरटीपी) गुन्हा दाखल करून घेतला आहे.

या गुन्ह्यात भूमाफिया प्रमोद रमेश भोईर, भूषण रमेश भोईर आणि लोकेश श्रीनिवास गावडा यांना आरोपी करण्यात आले आहे. माहिती कार्यकर्ते विनोद जोशी गेल्या दोन वर्षापासून साईतीर्थ आर्केड या बेकायदा इमारतीवर कारवाई करावी या मागणीसाठी पालिका, शासनस्तरावर प्रयत्नशील आहेत. याचिकाकर्ते हरेष म्हात्रे यांच्या डोंबिवली पश्चिमेतील १४ बेकायदा इमारत प्रकरणात या इमारतीचा समावेश आहे.

ह प्रभागाचे प्रभारी अधीक्षक अर्जुन वाघमारे यांनी तक्रारीत म्हटले आहे, बांधकामधारक सिताबाई भोईर यांच्या पुढाकाराने भूमाफिया प्रमोद रमेश भोईर, भूषण रमेश भोईर आणि लोकेश श्रीनिवास गावडा यांंनी डोंबिवली पश्चिमेतील ठाकुरवाडी भागात अधिकृत समर्थ जलाराम ज्योत इमारतीच्या बाजुला एक बेकायदा इमारत उभारली आहे, अशी तक्रार ह प्रभागात प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने साहाय्यक आयुक्तांनी या इमारतींच्या बांधकामधारकांना इमारतीची अधिकृतता सिध्द करणारी आवश्यक कागदपत्रे २४ तासाच्या आत सादर करण्याची नोटीस बजावली होती. बांधकामधारक सुनावणीला हजर राहिले नाहीत.

बांधकामधारकांनी साईतीर्थ आर्केड बेकायदा इमारतीची कागदपत्रे सुनावणीच्यावेळी दाखल केली नाहीत आणि स्वताही सुनावणीला हजर राहिले नाहीत म्हणून ह प्रभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी साईतीर्थ आर्केड इमारत अनधिकृत घोषित केली. या आदेशानंतर बांधकामधारकांनी येत्या आठ दिवसात साईतीर्थ इमारत भुईसपाट करून घेण्याचे आदेश दिले.

बांधकामधारकांंनी दिलेल्या अवधीत बेकायदा इमारत स्वताहून तोडून घेतली नाही. पालिकेच्या परवानग्या न घेता बेकायदा इमारतीची उभारणी केली म्हणून महाराष्ट्र प्रादेशिक नगरचना आणि नियोजन (एमआरटीपी) कायद्याने बांधकामधारकांविरुध्द तक्रार करण्यात येत आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.

कुंभारखाणपाडा येथील साई रेसिडेन्सी बेकायदा इमारत भुईसपाट करण्याची कार्यवाही सुरू असतानाच आता साईतीर्थ आर्केड इमारत पालिकेच्या रडारवर आली आहे.

साईतीर्थच्या बांधकामधारकांनी परवानगीची आवश्यक कागदपत्रे सुनावणीत दाखल केली नाहीत. सुनावणीकडे पाठ फिरवली म्हणून त्यांच्यावर एमआरटीपीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. – राजेश सावंत, सहाय्यक आयुक्त.