कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे संपूर्ण नुतनीकरणाचे काम करावयाचे आहे. या कामासाठी शासन निधीची गरज आहे. पालिका निधीतून तात्पुरती देखभाल दुरूस्ती होऊ शकते. त्यामुळे शासनाकडे संपूर्ण नुतनीकरण कामासाठी निधीची मागणी केली आहे. हा निधी तात्काळ उपलब्ध झाला तर हे काम ऑगस्टमध्ये सुरू होईल आणि दोन महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये नाट्यगृह प्रेक्षकांसाठी खुले होऊ शकते, असे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात डोंबिवलीतील एमआयडीसी भागातील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या छताचा प्लास्टर ऑफ पॅरीसचा काही भाग कोसळला. नाट्यगृहात कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रेक्षकांची सतत वर्दळ असते. त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने नाट्यगृह नाट्यप्रयोगांसह इतर सर्व कार्यक्रमांसाठी पंधरा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला छताच्या पडलेल्या भागाची डागडुजी करून नाट्यगृह सुरू करण्याचे नियोजन प्रशासन करत होते. त्यानंतर पंधरा दिवसांनी नाट्यगृह सुरू करण्याचे प्रस्तावित होते.
दरम्यानच्या काळात सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचा संपूर्ण भाग सुस्थितीत आहे ना, याची तपासणी करण्याचा निर्णय शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे घेतला. या नाट्यगृहाची संरचनात्मक तज्ज्ञांकडून पाहणी करण्यात आली. त्यावेळी नाट्यगृहाच्या काही महत्वाच्या ठिकाणी दुरुस्ती आवश्यक असल्याचे संरचनात्मक तज्ज्ञांनी पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले.
छत कोसळलेल्या भागाची तात्पुरती देखभाल दुरुस्ती करून थोड्या काळासाठी सावित्रीबाई नाट्यगृह खुले करण्याऐवजी संपूर्ण नाट्यगृहाचे नुतनीकरण करून मगच नाट्यगृह खुले करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. तात्पुरत्या देखभालीचा खर्च पालिका प्रशासन करू शकते. संपूर्ण नाट्यगृहासाठी खर्च करणे पालिकेपुढे आव्हानात्मक असल्याने पालिकेने शासनाकडे आवश्यक निधीची मागणी केली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
आता सावित्रीबाई फुले नाट्यगृह दुरुस्तीच्या खर्चाचा प्रस्तावाची प्रक्रिया सुरू आहे. शासनाकडे निधीची मागणी केली आहे. शासनाकडून तात्काळ निधी उपलब्ध झाला तर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण नाट्यगृह नुतनीकरणाचे काम सुरू केले जाईल. हे काम पूर्ण होण्यासाठी किमान दोन महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सप्टेंबर अखेर किंवा १५ ऑक्टोबरपर्यंत सर्व कामे पूर्ण करून सावित्रीबाई नाट्यगृह खुले करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे अधिकारी म्हणाले.
गेल्या दीड महिन्यापासून सावित्रीबाई फुले नाट्यगृह बंद असल्याने डोंबिवली परिसरातील नाट्यप्रेमींंना कल्याण, ठाणे येथे जावे लागत आहे. सावित्रीबाई फुले नाट्यगृह लवकर सुरू करण्याची नाट्यप्रेमींची मागणी आहे.
सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या छताचे पीओपी पडलेल्या भागाची दुरूस्ती, आणि संपूर्ण नाट्यगृहाचे नुतनीकरण या स्तरावर विचारविनीमय सुरू आहे. संपूर्ण नुतनीकरणासाठी शासनाकडून निधीसाठी प्रयत्न केले जात आहेत. अन्यथा पालिका निधीतून तात्पुरती दुरुस्ती केली जाईल. संरचनात्मक तज्ज्ञांनी नाट्यगृहाच्या इतर भागांच्या दुरुस्तीचा अहवाल दिला आहे. त्यामुळे संपूर्ण नाट्यगृहाच्या नुतनीकरण करण्याचा प्रशासन विचार करत आहे. – रोहिणी लोकरे, कार्यकारी अभियंता.