डोंबिवली – डोंबिवली शहरातील सर्वाधिक वर्दळीचा टिळक रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. दररोज दुचाकीस्वार या खड्ड्यांमध्ये पडून जखमी होत आहेत. वाहने खड्ड्यात आपटून बंद पडत आहेत. सामान्य नागरिकांना नाहीच, पण ज्येष्ठ, वृद्ध यांनाही या खड्ड्यातून चालणे शक्य होत नाही. असा खड्ड्यांमुळे चर्चेत आला टिळक रस्ता नक्की चालण्यासाठी आहे की पोहण्यासाठी आहे हे एकदा कल्याण डोंबिवली पालिकेने जाहीर करावे, असा उद्विग्न प्रश्न येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत पावगी यांनी केला आहे.

टिळक रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. त्याच बरोबर या रस्त्यालगतच्या पदपथांवरील फरशा निघाल्या आहेत. काही ठिकाणी फरशांवर शेवाळ साचले आहे. पदपथही चालण्यासारखे नाहीत. रस्त्यावरील खड्ड्यातून चालण्या शिवाय डोंबिवलीतील नागरिकांना पर्याय नाही. टिळक रस्ता हा डोंबिवली पूर्वेतील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. या खड्ड्यांमधील साचलेले पाणी पाहिले तर लहान मुलेही त्यात पोहू शकतात अशी परिस्थिती आहे.

टिळक रस्त्यावरील ताई पिंगळे चौकातून डोंबिवली परिसरातील गृहसंकुलांच्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस सुटतात. लांब पल्ल्याच्या पर्यटन बस याच रस्त्यावरून सुटतात. संध्याकाळी सात वाजल्यानंतर या रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली की दररोज ताई पिंगळे चौक वाहतूक कोंडीने गजबून जातो. डोंबिवली रेल्वे स्थानकाकडून एमआयडीसीकडे जाणारी आणि एमआयडीसीकडून रेल्वे स्थानकाकडे येणारी वाहने या रस्त्यावर अडकून पडतात.

या कोंडीतून सुटका करण्यासाठी मोटार कार चालक, दुचाकीस्वार ब्राह्मण सभेजवळील गल्लीतून आगरकर रस्त्याने फडके रस्ता, मुखर्जी रस्ता, सावरकर रस्त्याने इच्छित स्थळी जाण्याचा प्रयत्न करतात. पालिकेने रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण केलेल्या या रस्त्यावर दुतर्फा मोटारी उभ्या करून ठेवलेल्या असतात. एकेरी मार्गिकेतून प्रवाशांना प्रवास करावा लागतो, असे सामाजिक कार्यकर्ते पावगी यांनी सांगितले.

अनेक वेळा रुग्णवाहिका या रस्त्यावर अडकून पडतात. टिळक पुतळा ते चार रस्ता दरम्यानच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. स्मार्ट सिटीचा गवगवा करणाऱ्या कल्याण डोंबिवलीतील खड्डेमय रस्त्यांना जबाबदार कोण? कोट्यवधीचा कर पालिका नागरिकांकडून दरवर्षी जमा करते, त्याचा विनियोग होतो कोठे? वर्षानुवर्षचे हे खड्ड्यांचे दुष्टचक्र संपणार की नाही. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील इतर शहरे सुस्थितीत होत असताना कल्याण, डोंबिवली ऐतिहास, सांस्कृतिक शहरे स्मार्ट होण्याऐवजी दिवसेंदिवस खड्ड्यांत चालली आहेत. याचा विचार लोकप्रतिनिधी करतात की नाही, असे प्रश्न पावगी यांनी उपस्थित केले आहेत.

शहरातील खड्डे भरणीची कामे सुरू करण्यात आली आहेत. गणेशोत्सवापूर्वी खड्डे, रस्ते सुस्थितीत केले जातील. – मनोज सांगळे, कार्यकारी अभियंता

कल्याण डोंबिवली शहरे स्मार्ट सिटीच्या यादीत आहेत. स्मार्ट सिटीचा अर्थ पाहिला तर या शहरातील रस्ते चालण्यायोग्य तरी हवेत. पण तसे चित्र कोठेही दिसत नाही. या शहरात प्रशासन अस्तित्वात आहे की नाही. रस्त्यावरून वाहने चालविणे सोडाच पण लोकांना चालणे मुश्किल झाले आहे. – श्रीकांत पावगीसामाजिक कार्यकर्ते, डोंबिवली.