कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेकडून डोंंबिवली पूर्व, पश्चिम शहराला होणारा पाणी पुरवठा बुधवारी (ता. १३ ऑगस्ट) तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी दुपारी एक ते संध्याकाळी सहा या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेच्या डोंबिवली विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी घेतला आहे.
डोंबिवली शहराला उल्हास नदी काठच्या मोहिली येथील उदंचन केंद्रातून पाणी पुरवठा केला जातो. हे पाणी कल्याण पश्चिमेतून बैलबाजार, गोविंदवाडी, पत्रीपूल भागातून रेल्वे मार्गाखालून नेतिवली येथील टेकडीवरील जलशुध्दीकरण केंद्रात आणले जाते. उल्हास नदीतून उचललेले हे कच्चे पाणी नेतिवली येथील जलशुध्दीकरण केंद्रात शुध्द करून मग डोंबिवली पूर्व, पश्चिम शहराला पुरवठा केले जाते.
पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. उल्हास खोऱ्यातून डोंगर दऱ्यातून वाहत आलेला गाळ, पालापाचोळ नदीतून वाहत असतो. उल्हास नदीकाठी कल्याण पश्चिमेत मोहिली येथे हे पाणी कल्याण डोंबिवली पालिका शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी उचलते. हे पाणी कच्चे असते. पाणी उंदचन केंद्रात सयंत्रातून गाळून घेताना अनेक वेळा तांत्रिक समस्या निर्माण होतात. सतत उचलण्यात येणाऱ्या पाण्यातील गाळ, पालापाचोळ्याचा निचरा करताना उंदचन केंद्रातील सयंत्रे जाम होतात. काही वेळी ती बंद पडतात.
किंवा काही वेळा सयंत्रे गाळाने जाम झाल्याने त्यांचा पाणी उचलण्याचा वेग कमी होतो. हे तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी उदंचन केंद्र बंद ठेवावी लागतात. मग तांत्रिक अडथळे दूर करून ही कामे पूर्ण करावी लागतात. अशी तातडीची कामे पूर्ण करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला उल्हास नदी काठची उदंचन केंद्रे बंद ठेवावी लागतात. ही केंद्रे बंद ठेवली की मग या केंद्रांवर अवलंबून असणारी जलशुध्दीकरण केंद्रे बंद ठेवावी लागतात.
बुधवारी मोहिली उदंचन केंद्र बंद राहणार आहे. त्यामुळे या केंद्रावर अवलंंबून असणारे नेतिवली येथील जलशुध्दीकरण केंद्र पालिकेकडून बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे डोंबिवली पूर्वेतील पाथर्ली, ठाकुर्ली, चोळे, ९० फुटी रस्ता, भोईरवाडी, पेंडसेनगर, सारस्वत काॅलनी, गोग्रासवाडी, अयोध्यानगरी, फडके रस्ता परिसर, सुनीलनगर, आयरे रस्ता, राजाजी पथ, म्हात्रेनगर, डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर, डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगर, मोठागाव, ठाकुरवाडी, कोपर, शास्त्रीनगर, जयहिंद काॅलनी, सुभाष रस्ता, नवापाडा, कुंभारखाणपाडा, देवीचापाडा, उमेशनगर, चिंचोड्याचापाडा, गणेशनगर, रेल्वे वसाहत परिसर, भागशाळा मैदान परिसराला होणारा पाणी पुरवठा बुधवारी बंद राहणार आहे.
पालिकेकडून सोसायटीला पाणी पुरवठा होण्याच्या वेळेत हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पुरेसा पाणी साठा करून देण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.