डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील बेकायदा बांधकामानंतर सर्वाधिक बेकायदा बांधकामे उभी राहिलेल्या आयरे गावातील एका बेकायदा चाळीतील घर खरेदीत विकासकाने मुंबईतील धारावी येथील घर खरेदीदाराची सहा लाख २० हजार रूपयांची फसवणूक केली आहे. या घर खरेदीदाराला घर नाहीच, पण घरासाठी भरलेले पैसे विकासकाने परत न केल्याने घर खरेदीदाराने याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सुर्याबिलिंगम नाडार (२९) असे तक्रारदाराचे नाव आहे. ते मुंबईतील धारावी येथील संत कक्कया मार्ग, महाराणा प्रताप नगर परिसरात राहतात. नाडार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एस. पी. ग्रुप साई एन्टरप्रायझेसचे युसुफ शेख यांच्या विरूध्द तक्रार केली. पोलिसांनी त्यांच्या विरूध्द फसवणुकीचा गु्न्हा दाखल केला. आयरे गावातील बालाजी गार्डन संकुलामागील श्रीरामनगर, गणेश कृपा चाळ भागात एस. पी. ग्रुप साई एन्टरप्रायझेसचे कार्यालय आहे. एप्रिल २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

नाडार यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे की, आपणास डोंबिवलीत आयरे गाव भागात चाळीतील घर खरेदी करायची होती. यासाठी आपण एप्रिलमध्ये आयरे गावात एसपी ग्रुपच्या कार्यालयात आलो. तेथे आपणास युसुफ शेख यांचा कामगार पंकज (३५) यांनी साई सिध्दी चाळ मधील दोन खोल्या दाखविल्या. दोन्ही खोल्या पसंत पडल्याने आपण घर खरेदीसाठी पसंती दर्शवली. त्यावेळी युसुफ शेख यांनी मी तुम्हाला खोलीमधील काही काम करून मग घराचा ताबा देतो. या सुशोभिकरण कामासाठी तुम्हाला अधिकचे पैसे द्यावे लागतील.

ठरल्याप्रमाणे घर खरेदीचा करारनामा युसुफ शेख यांनी कस्तुरी प्लाझा मधील एका घर खरेदी विक्रीचे दस्तऐवज करणाऱ्या कार्यालयात तयार केला. हा करारनामा कच्च्या स्वरूपात होता. या करारनाम्यासाठी तक्रारदार नाडर यांनी एकूण दोन लाख ५० हजार रूपये शेख यांना दिले. सदरचा करारनामा चार लाख रूपयांचा बनविला होता. हा कच्चा करारनामा मी तुम्हाला लवकरच पक्का करून देतो, असे शेख यांनी नाडार यांना आश्वासन दिले होते. साई सिध्दी चाळीतील दोन्ही खोल्या प्रत्येकी सात लाख ५० हजार रूपयांना खरेदी करण्याची तयारी नाडार यांनी केली होती. या दोन्ही खोल्यांसाठी एकूण १५ लाख रूपये नाडार यांनी भरण्याची तयारी सुरू केली होती.

घर खरेदीचा ताबा मिळण्यासाठी आणि इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नाडार यांनी एसपी ग्रुपचे युसुफ शेख यांना ऑनलाईन माध्यमातून सहा लाख २० हजार रूपये त्यांच्या बँक खात्यावर पाठविले. रक्कम भरणा केल्यानंतर नाडार युसुफ यांच्याकडे घराचा ताबा देण्यासाठी, तसेच, घर खरेदीचा कच्चा करारनामा पक्का करून घेण्यासाठी एप्रिलपासून तगादा लावून होते. वेगवेगळी वेळकाढू कारणे देऊन युसुफ घराचा ताबा देण्यास टाळाटाळ करत होते. आपणास घराचा ताबा देणार नसाल तर आपले पैसे परत करा, असे सतत सांगुनही युसुफ यांनी पैसे परत केले नाहीत. घर नाहीच पण पैसेही युसुफ परत देत नसल्याने अखेर नाडार यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक नरळे तपास करत आहेत.