डोंबिवली : मुसळधार पाऊस, वादळवारा अशी परिस्थिती नसताना डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचापाडा, देवीचापाडा, महाराष्ट्रनगर भागात दररोज वीज प्रवाह खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. अर्धा ते एक तासानंतर वीज प्रवाह सुरू झाल्यानंतर पुन्हा काही वेळाने वीज प्रवाह खंडित होत आहे. दिवस, रात्र हा प्रकार सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
वीज प्रवाह खंडित झाल्यानंतर यासंदर्भातचे कारण विचारण्यासाठी महावितरणच्या सुविधा क्रमांकावर संपर्क साधल्यास, वीज पुरवठा पूर्ववत होईपर्यंत संपर्क क्रमांक सतत व्यस्त असतो. एक तास वीज पुरवठा खंडित असेल तर तेवढ्या वेळेत हा संपर्क क्रमांक व्यस्त असतो, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.पावसामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या वेळेत वीज पुरवठा खंडित झाला. हवा येण्यासाठी दरवाजा खिडक्या उघडे ठेवले तर घरात डास येतात. डेंग्यु, मलेरिया साथीचा वाढता प्रभाव विचारात घेऊन वीज प्रवाह बंद झाल्यानंतर घराच्या दरवाजा, खिडक्या उघड्या ठेवणे भीतीदायक झाले आहे, असे नागरिकांनी सांगितले.
सकाळ ते रात्री उशिरापर्यंत गरीबाचापाडा, महाराष्ट्रनगर, देवीचापाडा, नवापाडा भागात हा विजेचा लपंडाव सुरू आहे. पहाटेच्या वेळेत वीज प्रवाह खंडित झाला की घरातील नोकरदारांचा कार्यालयात जाण्यासाठीचा भोजनाचा डबा तयार करणे, मुलांची शाळेची तयारी अशा अनेक गोष्टीत अडथळे येतात. संध्याकाळी कामावरून दमुन आलेला नोकरदार वर्ग घरात शांत बसलेला असताना अनेक वेळा वीज प्रवाह खंडित होतो. विद्यार्थ्यांना घरात अभ्यास करणे शक्य होत नाही, अशा तक्रारी पालकांनी केल्या.
डोंबिवली पश्चिमेत अनेक ठिकाणी महावितरणच्या जुन्या वीज वाहिन्या आहेत. या वाहिन्यांच्या ठिकाणी नवीन वाहिन्या टाकून वीज प्रवाह सुस्थितीत करण्याची गरज आहे. या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्याने महावितरणचे स्थानिक अधिकारी वीज वाहिनीचा खराब झालेला भाग जोडून आहे त्या वीज वाहिनीतून प्रवाह सुरू करतात. मुसळधार पाऊस सुरू होऊन अशा वाहिनीत पाणी गेले की ती वाहिनी पुन्हा खराब होऊ वीज पुरवठा खंडित होतो. काही ठिकाणी उंच गृहसंकुले उभी राहिली आहेत, त्या गृहसंकुलांना स्वतंत्र रोहीत्र नसल्याने जुन्या रोहित्रांवरून वीज पुरवठा केला जातो. विजेच्या वाढत्या मागणीमुळे या रोहित्रावर भार येऊन तांत्रिक अडचणी निर्माण होऊन वीज पुरवठा खंडित होतो, असे एका जाणकाराने सांगितले. डोंबिवलीतील खंबाळपाडा, ९० फुटी रस्ता भागातील रहिवासीही सततच्या वीज खंडित वीज पुरवठ्याने हैराण आहेत.