डोंबिवली – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात केळकर रस्त्याने पायी चाललेल्या एका ३० वर्षीय महिलेला शुक्रवारी संध्याकाळी पाठीमागू एका रिक्षा चालकाने रिक्षाची जोराने धडक दिली. या धडकेनंतर महिलेला कोठे मार लागला की याची चौकशी करण्याऐवजी रिक्षेसह पळून जाणाऱ्या रिक्षा चालकाला महिलेने पाठलाग करून इंदिरा चौकात अडवून त्याला आक्रमक शब्दात सुनावले. वाहतूक पोलिसांसमोर हा सगळा प्रकार घडला. अखेर रिक्षा चालकाने हात जोडून महिलेची माफी मागितल्याने रिक्षा चालकाची सुटका झाली.
डोंबिवली पूर्व, पश्चिम भागात अनेक रिक्षा चालक मूळ मालकांकडून भाड्याने रिक्षा चालविण्यासाठी घेतात. रिक्षा वाहनतळावर उभे न राहता वर्दळीचे रस्ते, बाजारपेठ असलेल्या रस्त्यांवर रिक्षा उभ्या करून प्रवासी मिळविण्याचे प्रयत्न करतात. वाहनतळावर उभे राहिले की प्रवासी मिळण्यास विलंब होतो. त्यापेक्षा वाहनतळ सोडून प्रवासी मिळाले की अधिकच्या प्रवासी फेऱ्या मारतात असा विचार रिक्षा चालक करतात. हे चालक गणवेशात नसतात.
शुक्रवारी संध्याकाळी ३० वर्ष वयोगटातील एक पादचारी महिला डोंबिवली पूर्व केळकर रस्त्याने चालली होती. या वर्दळीच्या रस्त्यावर भरधाव वेगात असलेल्या एका रिक्षा चालकाने केळकर रस्त्याने चाललेल्या पादचारी महिलेला पाठीमागून रिक्षाची जोरदार दोन वेळा धडक दिली. महिलेच्या रोषाला सामोरे जावे लागू नये म्हणून रिक्षा चालकाने भरधाव वेगात रिक्षा इंदिरा चौकाच्या दिशेने काढली. कारण नसताना रिक्षा चालकाने धडक दिल्याने संतप्त झालेल्या महिलेने रिक्षाच्या पाठीमागून वेगाने पळत जाऊन इंदिरा चौकात पळणाऱ्या रिक्षा चालकाला रिक्षासह अडविले.
त्याला फैलावर घेत धडक का दिली म्हणून जाब विचारला. धडक देऊन मदत करण्याऐवजी पळून का जात होतास, असे प्रश्न महिलेने केल्यावर रिक्षा चालक गडबडला. या गोंधळामुळे इंदिरा चौकात कोंडी झाली. चौकात गस्तीवर असलेले वाहतूक पोलीस अधिकारी, वाहतूक सेवक यांच्या समोर हा गोंधळ सुरू होता. संतप्त महिला रिक्षा चालकावर रोष व्यक्त करत होती. या चालकावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी तिची मागणी होती. महिलेचा आवेश पाहून वाहतूक पोलीसही शांत होते. ते रिक्षा चालकाला पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याच्या तयारीत होते.
रिक्षा चालक पळून जाईल म्हणून ही महिला रिक्षासमोर उभी राहून जाहीरपणे रिक्षा चालकावर आपला राग व्यक्त करत होती. या महिलेकडून आपणास मार पडणार असे वाटू लागल्यावर वाहतूक सेवकाच्या सूचनेप्रमाणे रिक्षा चालकाने हात जोडून संतप्त महिलेची माफी मागितली. तरीही महिला ऐकण्यास तयार नव्हती. अशा बेदरकार, मुजोर रिक्षा चालकांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी महिलेची भूमिका होती. अखेर वाहतूक पोलिसांनी महिलेची समजतू काढल्यावर बेदरकार रिक्षा चालकाचा मार्ग मोकळा झाला. संतप्त महिला रिक्षाच्या मार्गातून बाजुला झाली. असा प्रकार पु्न्हा केला तर भर रस्त्यात तुडविण्याचा इशारा या महिलेने रिक्षा चालकाला दिला.