डोंबिवली – आपणास रेल्वे विभागात लिपिक आणि तिकीट तपासणीस अशा नोकऱ्या लावून देतो, असे सांगून तीन इसमांनी डोंबिवली जवळील कोळेगावमध्ये राहणाऱ्या एका नोकरदाराच्या मुलाची आणि त्यांच्या दोन नातेवाईक तरूणांची एकूण २३ लाख रूपयांची फसवणूक केली आहे. या फसवणूक प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात फसवणूक झालेल्या नोकरदाराने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

फसवणूक झालेले नागरिक चंद्रकांत किसन सानप (४६) यांनी या फसवणूक प्रकरणी डोंबिवलीतील विशाल वसंत निवाते, अरविंद उर्फ नितीन मोरे आणि अन्य एक इसम यांच्या विरूध्द मानपाडा पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार दाखल केली आहे. ते निळजे गावाजवळील कोळेगावमध्ये राहतात. फेब्रुवारी २०२५ ते जुलै या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

मानपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीतील माहिती अशी, की गुन्हा दाखल इसम विशाल वसंत निवाते यांनी तक्रारदार चंद्रकांत सानप यांना आपण रेल्वे विभागात नोकरीला आहोत. आपली वरिष्ठ पातळीवर चांगली ओळख आहे, असे चित्र निर्माण केले. आपण तुमच्या मुलाला आणि इतर नातेवाईक तरूण मुलांना रेल्वेत ओळखीने नोकरी लावून देऊ शकतो, असे खोटे सांगितले. विशाल निवते यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन चंद्रकांत सानप यांनी आपल्या मुलासह आपल्या इतर दोन नातेवाईक मुलांना रेल्वेत नोकरी लावण्याचा विचार केला.

रेल्वेत नोकरी लावण्याच्या बदल्यात काही पैसे भरणा करावे लागतील, असे सांगून तिन्ही गुन्हा दाखल इसमांनी हळुहळू चंद्रकांत सानप यांच्यासह त्यांचा एक नातेवाईक आणि मित्राचा मुलगा यांच्याकडून पैसे स्वीकारण्यास सुरूवात केली. नोकरी लागण्यापूर्वीच आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अरविंद उर्फ नितीन मोरे यांच्या उपस्थितीत तिन्ही तरूणांच्या मुंबईतील जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय चाचण्या एका कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत करण्यात आल्या. आपण तुमच्या मुलासह इतर दोन तरूणांना रेल्वेत नोकरी लावून देतो, असा देखावा या तीन इसमांनी सानप यांच्या समोर उभा केला. नोकरी लावण्यासाठी लागणारे पैसे तीन मुलांकडून तीन इसमांनी वसूल केले. अशी एकूण २३ लाखाची रक्कम या इसमांनी उकळली.

वैद्यकीय तपासणीनंतर आता नोकरीची नियुक्तीची पत्रे तुम्हाला मिळतील असे आश्वासन तीन इसमांनी सानप यांना दिले. त्याप्रमाणे चंद्रकांत सानप यांचा मुलगा प्रशांत, भाचा सुनील आणि मित्राचा मुलगा संजय यांना तिन्ही इसमांनी रेल्वेत तिकीट तपासणीस पदावर रूजू होण्याची बनावट नियुक्ती पत्रे दिली. रेल्वे विभागाचे बनावट ओळखपत्र दिले. नियुक्ती पत्रे मिळाल्यानंतर तीन तरूणांनी या नियुक्ती पत्राची, ओळखपत्रांची खात्री केली, तेव्हा ती बनावट असल्याचे आढळले. तीन इसमांनी आपला विश्वास संपादन करून रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आपल्या मुलासह इतर दोन मुलांची नोकरीला न लावता आर्थिक फसवणूक केली. आपल्याकडून घेतलेल्या रकमेचा अपहार केला म्हणून सानप यांनी तीन इसमांविरूध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक राळेभात तपास करत आहेत.