कल्याण- कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय विभागाने विभागवार असलेल्या नागरी आरोग्य केंद्रांमधील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घरोघर रुग्ण तपासणी मोहीम सुरू केली आहे.

बदलत्या वातावरणामुळे आता ताप, सर्दी, खोकला, थंडीचे रुग्ण वाढत आहेत. अशा रुग्णांमधून करोना सकारात्मक रुग्ण आढळण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरांमध्ये आढळून येणाऱ्या साथीच्या रुग्णांची वैद्यकीय तपासणी आरोग्य केंद्रातील कर्मचारी करत आहेत. संशयास्पद तापाच्या रुग्णांवर नियमित लक्ष ठेऊन त्याने वेळेत औषध, गोळ्या घ्याव्यात म्हणून पाठपुरावा केला जात आहे. घरातील प्रत्येकाने बाहेर जाताना मुखपट्टी घालावी अशी सूचना प्रत्येक घरात केली जात आहे, असे पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी सांगितले.

पालिकेच्या शास्त्रीनगर, रुक्मिणीबाई रुग्णालयात करोनाच्या नियमित चाचण्या केल्या जातात. नागरी आरोग्य केंद्रांमध्ये ही सुविधा आहे. करोना रुग्ण संख्या वाढू लागली तर करोना चाचण्या, प्रतिजन चाचण्यांची संख्या वाढविली जाणार आहे. करोना काळजी केंद्रांमधील वैद्यकीय साहित्य, तेथील मांडणी आहे त्या स्थितीत बांधून, झाकून ठेवण्यात आली होती. करोना रुग्ण वाढू लागल्याने आयत्या वेळी धावपळ नको म्हणून तेथे स्वच्छता करण्यास सुरूवात केली आहे.

करोना रुग्ण आढळून येत असले तरी असे रुग्ण खासगी डॉक्टर, नागरी आरोग्य केंद्रातील उपचार घेऊन ठीक होत आहेत. रुग्णालयात, काळजी केंद्रात दाखल होण्याचे प्रमाण खूप कमी आहे, असे डॉ. पाटील यांनी सांगितले. पालका हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून करोना रुग्णांची शून्य रुग्ण संख्या होती. ही संख्या आता ३४ वर पोहचली आहे. काळजी केंद्रात एकूण १४३ रुग्ण उपचार घेत आहेत. १० ते १५ रुग्ण दररोज काळजी केंद्रातून सुखरूप घरी जात आहेत. कल्याण पश्चिमेत सर्वाधिक ११ करोनाचे रुग्ण घरगुती पध्दतीने उपचार घेत आहेत. डोंबिवली पूर्व, पश्चिमेत एकूण १५ रुग्ण, कल्याणमध्ये १८ रुग्ण, टिटवाळा येथे एक रुग्ण उपचार घेत आहे. करोनाने एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. गेल्या दोन वर्षात एक लाख ६३ करोना रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. पालिका हद्दीतील खासगी दवाखाने ताप, खोकला, सर्दीच्या रुग्णांनी भरून गेले आहेत. बदल्या हवामानाचा हा परिणाम आहे. या आजारातील रुग्ण तीन ते चार दिवसात ठीक होतो, असे खासगी डॉक्टरांनी सांगितले.