घाऊक बाजारात २० रुपये किलो; किरकोळीत ४० रुपयांचा दर

ठाणे : अवकाळी पावसामुळे आवक घटल्यामुळे महाग झालेला टोमॅटो घाऊक बाजारात स्वस्त झाला असला तरी, किरकोळ बाजारातील विक्रेत अजूनही महागाईच्या नावाखाली ग्राहकांना लुटत आहेत. घाऊक बाजारात सध्या टोमॅटो २० रुपये किलो दराने विकला जात आहे. मात्र, किरकोळ बाजारात ग्राहकांना तो ४० रुपये किलो दराने खरेदी करावा लागत आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे फळभाज्या, पालेभाज्या, कडधान्यांची आवक घटल्यामुळे त्यांच्या दरात वाढ झाली होती. त्या वेळेस टोमॅटोची ६० रुपये किलो दराने विक्री केली जात होती. मात्र, नोव्हेंबर महिन्यापासून फळभाज्या, पालेभाज्या, कडधान्यांचे वाढलेले दर काहीसे कमी झाले होते. तर टोमॅटोच्या दर २० रुपयांनी कमी झाले होते. डिसेंबर महिन्यात टोमॅटोचे दर आणखी २० रुपयांनी कमी झाले. त्यामुळे डिसेंबर महिन्यापासून घाऊक बाजारात २० रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री सुरू आहे. तर किरकोळ बाजारात २२ ते २३ रुपयांनी टोमॅटोची विक्री सुरू होती. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून किरकोळ बाजारातील टोमॅटोच्या दरात वाढ झाली असून त्याची ४० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.  वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाशिक आणि पुणे जिल्ह्य़ातून टोमॅटोची आवक होते. त्याचप्रमाणे या जिल्ह्य़ातून ठाणे आणि मुंबई परिसरातील मोठय़ा भाजी मंडईतही टोमॅटोची आवक होते. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज ५० ते ६० टोमॅटोच्या गाडय़ा दाखल होत आहेत, अशी माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी बाजार विभागाच्या अधिकारी प्रज्ञा तायडे यांनी दिली. तसेच टोमॅटोच्या दरात कोणतीही वाढ झालेली नसून त्याची २० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. किरकोळ विक्रेत्यांकडून टोमॅटोचे दर का वाढविण्यात आले, याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर घाऊक बाजारातून टोमॅटो खरेदी करताना आमच्याकडून जास्तीचे दर आकारले जात आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात ग्राहकांना दुप्पट दराने टोमॅटो विक्री केला जात आहे, असा दावा ठाण्यातील जांभळी नाका परिसरातील किरकोळ टोमॅटो विक्रेते रमेश वर्मा यांनी केला.