समता विचार प्रसारक संस्था आणि श्री समर्थ सेवक मंडळ या संस्थांच्या वतीने १४ व १५ फेब्रवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचा शुभारंभ शनिवारी संध्याकाळी सहा वाजता होणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे या दाम्पत्यांची प्रकट मुलाखतीने या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले जाणार आहे.
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथील शिवसमर्थ विद्यालयातील शिवदौलत सभागृहात या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ.कोल्हे दाम्पत्यांची मुलाखत मनीष जोसी घेणार असून सुरेंद्र लागू हे या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. समता विचार प्रसारक संस्थेने गेल्या पाच वर्षांपासून सुरू केलेल्या ‘व्याख्यान तुमच्या दारी’ या अभिनव संकल्पनेचा भाग म्हणून ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेचे पुढचे पुष्प रविवारी सायंकाळी सहा वाजता मानपाडा येथील साईबाबा मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ‘वंचितांचा रंगमंच’ या कार्यक्रमात मानपाडा परिसरातील मुलांनी सादर केलेले पारितोषीक प्राप्त नाटकाचे सादरीकरण केले जाणार आहे. त्याशिवाय ‘आजच्या तरुणाईवर चर्चा’ या कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.