नाल्यांमध्ये कचरा, प्लॉस्टिकचे ढीग असल्याने पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता
पावसाळा ऐन तोंडावर आला असताना कल्याण-डोंबिवलीतील नालेसफाईचे तीनतेरा वाजल्याचे चित्र असून शहरातील अनेक भागांमधील नाल्यांमध्ये कचरा, प्लॉस्टिकचे ढीग दिसून येत आहेत. वर्षभर गाळ, कचऱ्याने भरलेले नाले पावसाळा तोंडावर आला की साफ करण्याची धांदल महापालिका वर्तुळात सुरू होते. यंदाही नालेसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू झाल्याचे चित्र असले तरी पावसाळ्यापर्यंत सफाईची कामे पूर्ण होतील का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
प्रशासनाने नालेसफाईच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू केली. यंदा नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, विधान परिषद निवडणूक आचारसंहितेचे आयते कारण प्रशासनाला मिळाले असून शहरातील अनेक भागांमध्ये अत्यंत संथगतीने ही कामे सुरू असल्याचे चित्र दिसू लागले आहे. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील जरीमरी नाल्याच्या अवतीभोवती भिकारी, गर्दुल्ले यांचा चोवीस तास राबता असतो. फलाट क्रमांक एकवरील मुंबई दिशेकडील बाकडे व बाजूच्या परिसरात गर्दुल्ले, भिकारी मुलांची कायमची निवासस्थाने आहेत. नशापान करण्यासाठी गर्दुल्ले गोणपाट जाळतात. ते गोणपाट नेहमी नाल्यात फेकल्याचे दृश्य रेल्वे स्थानक भागात दिसते. बहुतांशी नाले बाजारपेठा, औद्योगिक क्षेत्र भागातून वाहतात. बाजारपेठा भागातून वाहत असलेल्या नाल्यांमध्ये दुकानातील टाकाऊ साहित्य, प्लॅस्टिक पिशव्या टाकण्यात येतात. मोठे नाले नियमित साफ केले जात नाहीत.

पाणीटंचाईचा फटका
प्रथमच तीव्र पाणीटंचाईला कल्याण-डोंबिवली शहराला सामोरे जावे लागले. गेल्या सात महिन्यांपासून शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. मागील तीन महिन्यांपासून शहराला आठवडय़ातून तीन दिवस पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे घरगुती पाण्याचा वापर कमी झाल्याने घरातून सांडपाणी म्हणून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. खडेगोळवली, सागाव, गांधीनगर, गुप्ते रोड, भरत भोईर हे बंदिस्त नाले वाहत असताना यापूर्वी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्याला खळाळत वाहत जाणाऱ्या नाल्याचा पाण्याचा आवाज येत असे. यावेळी प्रथमच नाल्यांमधून पुरेसे पाणी वाहत नसल्याने डबकी तयार झाली आहेत. वाहून आलेला कचरा काठाला, डबक्यांमध्ये साचला आहे. वर्षभर गाळ, कचऱ्याने भरलेले ४३ नाले पोकलेनच्या साहाय्याने साफ करण्यासाठी किमान महिनाभराचा कालावधी लागतो. यापूर्वी मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात नालेसफाईला सुरुवात होऊन दहा जूनपर्यंत नालेसफाई पूर्ण केली जात असे.

गटारे तुंबलेली
गटार सफाईची कामे यावेळी पालिकेच्या कामगारांकडून करण्यात येत आहे.मात्र, एकाही प्रभागात प्रभावीपणे गटार सफाईची कामे सुरू नाहीत. नालेसफाई, गटार सफाईची कामे जूनच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत पूर्ण झाली नाहीत तर पावसाच्या पाण्याने गटार, नाल्यांमधील सगळा कचरा रस्त्यावर येऊन शहरात घाणीचे साम्राज्य पसरले. मात्र पालिका अधिकारी नालेसफाई योग्यरित्या होत असल्याचा दावा करत आहेत.