ठाण्यात पेयजल प्रदूषणात वाढ

ठाणे महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठय़ाचे योग्य प्रकारे नियोजन होत नसल्याची ओरड सातत्याने होत असतानाच आता पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता घसरली असल्याची बाब समोर आली आहे. शहरामध्ये वितरित होणाऱ्या तसेच साठवणुकीच्या पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यात आले असून त्यामध्ये वितरण व्यवस्थेतील पाण्याच्या गुणवत्तेची टक्केवारी दोन टक्क्य़ांनी तर साठवणूक केलेल्या पाण्याची गुणवत्ता चार टक्क्य़ांनी घसरली आहे.

ठाणे महापालिकेमार्फत शहरामध्ये दररोज ४८० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा  करण्यात येतो. निवासी आणि झोपडपट्टी भागात दरडोई १३५ लिटर पाण्याचा पुरवठा होतो. त्याचप्रमाणे व्यावसायिक आणि इतर भागात दरडोई २१० लिटर प्रतिदिन इतका पाणी पुरवठा होतो. शहराची लोकसंख्या २० लाखांच्या घरात गेली असून त्यातुलनेत वितरित होणारे पाण्याचे प्रमाण जास्त असल्याचा महापालिकेचा दावा असतो. मात्र, शहरात पाणी पुरवठय़ाचे योग्य प्रकारे नियोजन होत नसल्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड नागरिक तसेच लोकप्रतिनिधीकडून होताना दिसून येते. अशा रीतीने पाण्याच्या उपलब्धतेविषयी नागरिक आणि प्रशासन यांची दोन टोकाची मते असताना पाण्याची गुणवत्ता खालावली असल्याचे पर्यावरण अहवालातून समोर आले आहे.

ठाणे शहरामध्ये २०१६ -१७ या कालावधीत पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यात आली. त्यासाठी वितरित होणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे एकूण १२ हजार ३१८ नमुने तपासण्यात आले होते. त्यापैकी ११ हजार २०१ नमुने पिण्यायोग्य तर एक हजार ११७ नमुने पिण्याअयोग्य असल्याचे समोर आले. २०१५ -१६ या कालावधीत पाण्याच्या गुणवत्तेची टक्केवारी ९३ टक्के होती तर २०१६-१७ मध्ये गुणवत्तेची टक्केवारी ९१ टक्के झाली आहे. त्याचप्रमाणे साठवणुक केलेल्या पिण्याच्या पाण्याचे १८ हजार १४ नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी १२ हजार ७९१ नमुने पिण्यायोग्य तर ४ हजार २३३ नमुने पिण्याअयोग्य असल्याचे समोर आले आहे.  २०१५ -१६ या कालावधीत या पाण्याच्या गुणवत्तेची टक्केवारी ७५ टक्के होती तर २०१६-१७ या वर्षांत पाण्याच्या गुणवत्तेची टक्केवारी ७१ टक्के झाली आहे. त्यामुळे साठवणुकीच्या पाण्याची गुणवत्ता चार टक्क्य़ांनी घसरली आहे.