ठाण्यात विनापरवाना दुचाकीवरून प्रवाशांची वाहतूक
ठाणे : राज्यात दुचाकीवरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कोणतीही परवानगी दिलेली नसतानाही ठाणे शहरात एका खासगी कंपन्यांकडून मोबाइल अॅपद्वारे दुचाकी प्रवासी सेवा पुरविली जात असल्याचे उघड झाले आहे. प्रवासी सेवा पुरविणाऱ्या दुचाकीस्वारांना आरटीओने कारवाई सुरू केली असून त्यामध्ये पाच दुचाकीस्वारांकडून दहा हजारांचा दंड वसूल करण्याबरोबरच त्यांचा वाहन परवाना एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून अॅप आधारित प्रवासी वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या वाहनांमध्ये टॅक्सी, रिक्षा आणि बसचा सामावेश आहे.
याच धर्तीवर दुचाकीवरही प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी एका कंपनीने एक मोबाइल अॅप सुरू केले आहे. या अॅपच्या माध्यमातून प्रवाशाला आता टॅक्सीप्रमाणे दुचाकीची नोंद करून त्याद्वारे इच्छित स्थळी प्रवास करता येतो. दुचाकीचा प्रवास रिक्षा आणि टॅक्सीपेक्षाही स्वस्त असल्याने अनेक प्रवासी त्याकडे वळू लागले आहेत, परंतु मोटार वाहन कायद्यानुसार राज्यात दुचाकीवरून प्रवासी वाहतुकीला परवानगी नाही. ठाणे जिल्ह्यातील काही रिक्षाचालक संघटनांनीही या अॅप आधारित दुचाकी प्रवासी वाहतुकीविरोधात तक्रारी देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे ठाणे उपप्रादेशिक परिवहन विभागाने अशा दुचाकीस्वारांवर कारवाई सुरू केली असून, त्यात पाच जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याकडून दहा हजारांचा दंड वसूल करण्याबरोबरच त्यांचा वाहन परवाना एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आला आहे. दरम्यान, कंपनीवर मात्र कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसून याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी रवी गायकवाड यांना विचारले असता, कायदेशीर बाबी तपासून कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.