ठाणे : गेल्या काही आठवड्यांपासून गायमुख घाट आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे हाल सुरू आहेत. रस्त्यावरील खड्डे आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वसई, नालासोपारा, आणि मिरा-भाईंदर भागातून ठाण्याच्यादिशेने प्रवास करणाऱ्यांच्या प्रवासाचा वेळ दुप्पट झाला आहे. तर ठाण्याहून बोरीवली, वसईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्यांना देखील याच समस्याला सामोरे जावे लागत आहे.

खड्ड्यांमुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्यांमुळे अनेक प्रवाशांना वेळेवर कार्यालयात पोहोचता येत नाही. परिणामी काहींना सक्तीने रजा घ्यावी लागल्या. तर काही प्रवाशांनी या त्रासदायक प्रवासाऐवजी रेल्वे मार्गाने प्रवास करण्याचा पर्याय निवडला आहे. काही प्रवाशांनी आपल्या वेळेत बदल करून घरातून सुमारे तासभर आधी निघण्यास सुरुवात केली. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक तणावालाही सामोरे जावे लागत आहे. संबंधित यंत्रणांनी लवकरात लवकर या मार्गांची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

घोडबंदर मार्ग आणि मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांसाठी दळणवळणाचा मार्ग आहे. गुजरात व वसई परिसरातून उरणमधील जेएनपीए बंदर किंवा भिवंडीच्या दिशेने वाहतुक करणारी अवजड वाहतूक प्रामुख्याने याच मार्गावरून केली जाते. यासोबतच, वसई-विरार आणि मिरा-भाईंदर परिसरातील हजारो नोकरदार नागरिक नवी मुंबई व ठाणे येथे नोकरीनिमित्त दररोज प्रवास करतात. गेल्या काही दिवसांपासून मुंबई अहमदाबाद मार्ग आणि घोडबंदर घाट मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्याचा परिणाम आता वाहतुक व्यवस्थेवर दिसून येतो.

नोकरदार दररोज वाहतुक कोंडीत अडकू लागल्याचे चित्र आहे. वसई भागातून खासगी वाहनाने ठाणे किंवा ऐरोली गाठण्यासाठी किमान दोन तास लागतात. परंतु या प्रवासाचा वेळ चार तासांवर गेला आहे. दोन्ही मार्गावर कोंडी झाल्यास प्रवासाचा कालावधी आणखी वाढत असतो. परिवहन सेवेच्या बसगाड्यांनी प्रवास करणाऱ्यांना कोंडीचा आणखी फटका बसत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.

महिला प्रवाशांचे हाल अधिक

खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे महिला प्रवाशांचे हाल अधिक होतात. खड्ड्यांमुळे मानसिक आणि शारिरीक त्राासाला सामोरे जावे लागते. तीन ते चार तास कोंडीतून प्रवास केल्यानंतर पुन्हा घरी जाऊन घरातील कामे करताना तारेवरची कसरत होते, असे एका महिला प्रवासीने सांगितले

मला नवी मुंबईतील ऐरोली भागात दररोज कानानिमित्ताने प्रवास करावा लागतो. मुंबई अहमदबाद मार्ग आणि घोडबंदर घाटात खड्डे आहेत. काही दिवसांपूर्वीच वसई येथील बापणे ते फाऊंटन हाॅटेल हे काही मिनीटांचे अंतर गाठण्यासाठी तब्बल चार तास लागले. अखेर मला कामावर सुट्टी घ्यावी लागली. खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे प्रवासाचा वेळ दुप्पट होऊ लागला आहे. आता कोंडीतून प्रवास टाळण्यासाठी रेल्वे मार्ग पत्करला. – संचित कुबल, प्रवासी, वसई.

वसईहून प्रवास करताना आता प्रवासाचा वेळ दुप्पट झालेला आहे. मुंबई अहमदाबाद मार्ग, घोडबंदर मार्गावर खड्डे पडले आहेत. ठाण्याच्या दिशेने प्रवास करताना दररोज कोंडीचा सामना करावा लागतो. दत्ता यादव, प्रवासी, वसई.

वसईहून ठाणे प्रवास कठीण झाला आहे. मागील गुरुवारी आणि शुक्रवारी वाहतुक कोंडीमुळे सुट्टी घ्यावी लागली. सोमवारी देखील दुपारी १२ वाजता कार्यालयात पोहचले. प्रवासामध्ये प्रचंड हाल होत आहेत. अंजली परब, प्रवासी, वसई