उल्हासनगरः उल्हासनगर शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक बेजार झाले असून त्यात रिक्षाचालकांचा संताप वाढला आहे. शहरातले रस्ते, चौक, उड्डाणपूल खड्ड्यांनी व्यापले गेल्याने वाहनांचा दुरूस्तीखर्च वाढला आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचा वेगही मंदावला असून परिणामी शारिरीक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो आहे. शहरातून या खड्ड्यांवर गाण्यांच्या माध्यमातून मार्मिक टीकाही केली जाते आहे. त्यामुळे शहरात पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
उल्हासनगर शहरातील रस्त्यांची दिवसेंदिवस दुरावस्था होते आहे. पाऊस सुरू होताच शहरातील डांबरी रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरूवात झाली. सोबतच शहराच्या महत्वाच्याच चौकात, पेव्हर ब्लॉक लावलेल्या ठिकाणीही खड्ड्यांचे साम्राज्य वाढले आहे. शहरातील खड्डयांचे साम्राज्य शहरातल्या उड्डाणपुलांवरही पसरलेले दिसत आहेत . त्यामुळे वाहनचालकांत संतापाचे वातावरण आहे.
उल्हासनगर शहरात अंबरनाथच्या दिशेने प्रवेश करताच खड्ड्यांना सुरूवात होते. कल्याण बदलापूर रस्त्यावर फॉलोवर लाईन, अनिल अशोख सिनेमागृहाबाहेरल खड्डे, पुढे सतरा सेक्शन चौक, शांतीनगर, तसेच कॅम्प एक, गोल मैदान, सिरू चौक, नेहरू चौक रस्ता, सपना उद्यानामागे, गुलराज टावर, कुर्ला कॅम्प, भाटीया चौक, व्हीटीसी मैदान रस्ता असे अनेक रस्ते सध्या खड्ड्यात गेले आहेत.
या खड्डयातून प्रवास करत असताना वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागते आहे. अनेकदा या खड्ड्यांच्या अंदाज न आल्याने वाहनचालकांचा तोल चुकतो आहे. या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहने धिम्या गतीने चालवावी लागतात. त्यामुळे महत्वाच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढली आहे. त्यामुळे वाहनचालकांना खड्डे आणि कोंडी अशा दोघांचा सामना करावा लागतो आहे.
या खड्ड्यांमुळे वाहनांच्या देखभाल दुरूस्तीचा खर्चही वाढला आहे. वाहनांमध्ये रिक्षाचालकांना सर्वाधिक फटका बसतो आहे. खड्ड्यांमुळे रिक्षा खिळखिळ्या होत असून त्यामुळे कमाई कमी आणि खर्चच अधिक अशी परिस्थिती उद्भवल्याचे रिक्षाचालक सांगतात. दुरूस्तीसोबतच ऐरवीच्या प्रवासापेक्षा खड्डे असलेल्या रस्त्यावरच्या प्रवासामुळे शारिरीक व्याधीही वाढल्याचे रिक्षाचालक सांगतात.
एकदा रिक्षा चालवून पाहा…
शहरातल्या रस्त्यांच्या दुरावस्थेवरून समाज माध्यमांवर पालिका प्रशासनावर टीका केली जाते आहे. एका कलाकाराने गाणाच्या माध्यमातून पालिकेच्या कारभारावर टीका केली आहे. ‘तकलीफ में मेरे शहर के रिक्षेवाले’, अशा आशयाचे गाणे सध्या उल्हासनगरात समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय बनले आहे. उल्हासनगर शहरातील खड्ड्यांवर एकदा फिरावे, वातानुकुलीत कार्यालयातून बाहेर येऊन शहरातल्या रस्त्यांची दुरावस्था पाहावी, तसेच एखाद्या दिवस रिक्षा चालवून पाहावी अशी विनंती रिक्षाचालक पालिका अधिकाऱ्यांना करत आहेत.