मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरील दुसऱ्या मार्गिकेच्याही दुरुस्तीचे काम; पुन्हा वाहतूक कोंडीचे विघ्न

किशोर कोकणे
ठाणे : अवजड वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुंब्रा बाह्य़वळणावरील रेतीबंदर पुलाची चाळण झाली आहे. यातील ठाण्याच्या दिशेकडील मार्गिकेवरील खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केल्यानंतर आता ठाण्याहून शिळफाटय़ाच्या दिशेने जाणाऱ्या रेतीबंदर पुलावरही दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. वाहतूक विभागाची परवानगी घेतल्यानंतर महिन्याभरात या पुलाच्या दुरुस्तीची सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणेकर पुन्हा वाहतूक कोंडीमुळे वेठीस धरले जाण्याची शक्यता आहे.

मे २०१८ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंब्रा बाह्य़वळण मार्गाच्या १२० मीटर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. त्यावेळी चार महिन्यांसाठी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. या कालावधीत ठाणेकरांना मोठय़ा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले होते. हे काम करत असताना येथील रेतीबंदर पुलावरील दुरुस्तीची कामे झाली नव्हती. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून दर पावसाळ्यात रेतीबंदर पुलाची चाळण होत आहे.

रेतीबंदर पुलावर ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर २८ जुलैला एक मोठा खड्डा पडला होता. त्यामुळे पुलाची अवस्था धोकादायक झाल्याने वाहतूक पोलिसांनी येथील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. वाहतूक पोलिसांनी येथील अवजड वाहतूक महापे, कोपरखैरणे, रबाळे, ऐरोली, कोपरी मार्गे वळविली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावरील या मार्गिकेच्या सर्वच खड्डय़ांची दुरुस्ती करण्यास सुरुवात केली. येथील खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला २० दिवस लागले. या कालावधीत ठाणे, नवी मुंबई येथील नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका सहन करावा लागत होता. बुधवारपासून येथील वाहतूक पूर्ववत झाली आहे. असे असले तरी ठाण्याहून शिळफाटय़ाच्या दिशेने येणाऱ्या पुलाच्या भागातही मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्याचा निर्णय आता सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. त्यासाठी विभागाने तयारी सुरू केली आहे. येत्या काही दिवसांत त्यासंदर्भाचे पत्र वाहतूक विभागाला देण्यात येणार आहे. काम करण्यासाठी वाहतूक शाखेची मंजुरी मिळाल्यास कामाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्याने दिली.

कोंडीचे ग्रहण सुटेना!

गुजरात, भिवंडी येथून हजारो अवजड वाहने मुंब्रा बाह्य़वळण मार्गे उरण जेएनपीटीच्या दिशेने जातात. गुजरात येथून येणारी वाहने माजीवडा येथून मुंबई-नाशिक महामार्गे, खारेगाव टोलनाका येथून येतात, तर भिवंडी येथून येणारी वाहने खारेगाव टोलनाक्यावरून येत असतात. मुंब्रा बाह्य़वळण मार्ग बंद झाल्यास येथील अवजड वाहनांना तीन हात नाका, कोपरी मार्गे तर ट्रक टेम्पोची वाहतूक कळवा नाका मार्गे वळविली जाऊ शकते. या दोन्ही मार्गावर खड्डय़ांचे साम्राज्य आहे. तसेच रस्तेही अरुंद आहेत. त्यामुळे ठाणेकर पुन्हा वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकण्याची शक्यता आहे.