परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित
मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या आठ वाहनचालकांचा परवाना सहा महिन्यांसाठी रद्द करण्यात आला आहे. वसईच्या वाहतूक शाखेने ही कारवाई केली आहे. वसई तालुक्यातील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या आठवडय़ात वसई वाहतूक शाखेने मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध मोहीम सुरू केली होती. वाहनचालकांची तपासणी सुरू असताना यामध्ये हे आठजण मद्यपान करुन वाहन चालविताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्यावर त्वरित कार्यवाही करून त्यांना १६ हजार रुपये दंड ठोठावला. शिवाय त्यांचा वाहन चालवण्याचा परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे.