मद्यधुंद तरुणांचा धिंगाणा; महिलेची छेड काढून पतीस मारहाण
बदलापूर पूर्वेतील स्कायवॉकवर तीन मद्यधुंद तरुणांनी एका महिलेची छेड काढून तिच्या पतीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने स्कायवॉकच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
बदलापूर पूर्वेकडील नवरत्न हॉटेलकडे जाणाऱ्या स्कायवॉकवर शुक्रवारी रात्री ११.३०च्या सुमारास एक महिला तिच्या पतीसोबत घरी परतत असताना तीन मद्यधुंद तरुणांनी अश्लील शेरेबाजी करत तिची छेड काढली. त्याचा जाब विचारायला गेलेल्या त्या महिलेच्या पतीला या तरुणांनी मारहाण केली. रात्रीची वेळ असल्याने या भागात इतर पादचाऱ्यांची संख्या कमी होती. यावेळी काही बघे या ठिकाणी जमले खरे मात्र सुरुवातीला कुणीही छेड काढणाऱ्या तसेच मारहाण करणाऱ्या तरुणांना हटकले नाही. थोडय़ा वेळाने काही प्रवाशांनी पुढाकार घेऊन मारहाण करणाऱ्या तरुणांना बाजूला सारत महिलेच्या पतीची सुटका केली. मात्र नशेत असणाऱ्या तरुणांनी या दाम्पत्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. नवरत्न हॉटेलच्या आवारात या दाम्पत्यांनी आसरा घेतला. हा वाद सुरू असताना काही जागरूक नागरिकांनी पोलिसांना घटनेचा तपशील कळवल्याने पोलीस तात्काळ तेथे हजर झाले. या तीनही तरुणांना पोलिसांनी घटनास्थळावरून दूर नेले. घाबरलेल्या दाम्पत्याने मात्र याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केली नाही. याप्रकरणी पोलीस दप्तरी अदखलपात्र नोंद करून एका तरुणाला ताब्यात घेऊन समज दिल्यानंतर सोडून दिल्याची नोंद आहे. याबाबत पोलिसांना विचारले असता दोन तरुण पळून गेल्याने सापडू शकले नाहीत. मात्र एकाला आम्ही समज देऊन सोडून दिले, असे सांगण्यात आले.
दरम्यान, या घटनेमुळे रात्रीच्या वेळेत रेल्वे स्थानक परिसरातून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चोऱ्या, घरफोडय़ा आणि सोनसाखळी गुन्हे रोखण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांवर नागरिकांचा रोष या घटनेनंतर वाढला आहे. स्कायवॉकवरील अतिक्रमण काढून मुख्याधिकाऱ्यांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली. मात्र सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तजवीज करण्यात आलेली नाही. स्कायवॉकवर साधे सीसीटीव्ही कॅमेरेही नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. स्कायवॉकखाली पश्चिमेला पोलीस चौकी आहे. असे असताना मद्यधुंद तरुणांचा या स्कॉयवॉकवर रात्री वावर असतो.
मूळात स्कायवॉकची सुरक्षा आमच्या अखत्यारीत येत नाही. घडलेल्या घटनेतील एका तरुणाला आम्ही समज देऊन सोडले आहे. दोन तरुण पळून गेल्याने हाती लागले नाहीत आणि पोलिसांनी योग्य ती कारवाई केली आहे.
-दिलीपकुमार राजभोज, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बदलापूर पूर्व पोलीस ठाणे.