कल्याण – मुसळधार पावसामुळे कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकातील बाजारपेठांमध्ये पाणी तुंबल्याने परिसरातील दुकाने, रस्ते जलमय झाले आहेत. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांना शासनाने सुट्टी जाहीर केल्याने रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांचा शुकशुकाट आहे. लोकल वेळेत धावत असल्या तरी स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी तुरळक आहे. खासगी आस्थापनांमध्ये काम करणारे कर्मचारी मुंबईतील रेल्वे मार्गांवर पाणी साचल्याने परतीच्या मार्गावर आहेत.
सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानके प्रवाशांनी खच्चून भरलेली असतात. मंगळवारी मुसळधार पावसामुळे शासकीय, खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांनी पूरमय परिस्थितीत कोठेही अडकायला लागू नये म्हणून घरी राहणे पसंत केले आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची तुरळक उपस्थिती आहे. प्रवाशांची वर्दळ कमी असल्याने शहरातील रिक्षा चालकांची रस्त्यावरील संख्या कमी झाली आहे. अनेक रिक्षा चालकांनी रिक्षेच्या इंजिनमध्ये पाणी जाऊन वाटेत रिक्षा बंद पडण्यापेक्षा घरी राहणे पसंत केले आहे.
उल्हास खाडी किनारच्या अटाळी, आंबिवली, गोविंदवाडी, डोंबिवलीत कुंभारखाणपाडा, देवीचापाडा, कोपर, आयरे भागातील सखल भागात खाडीचे पाणी घुसल्याने परिसरातील चाळी जलमय झाल्या आहेत. परिसर जलमय भागातील रहिवाशांनी आपल्या भागातील खासगी, पालिका शाळांचा आधार घेतला आहे. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर मुसळधार पाऊस असला की नेहमीच जलमय होतो. मंगळवारी सकाळपासून डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील डाॅ. राॅथ रस्ता, पाटकर रस्ता, नेहरू रस्ता, चिमणी गल्ली, रामनगर रेल्वे तिकीट खिडकी, वाहतूक कार्यालय परिसर सकाळपासून जलमय झाला. रेल्वे स्थानक भागातील दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. दुकानदारांची दुकानातील सामान सुस्थितीत ठेवण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र डोंबिवली रेल्वे स्थानक भागात आहे. कल्याणमधील शिवाजी चौक परिसर जलमय झाला आहे. नांदिवली स्वामी समर्थ मठ रस्ता जलमय झाला आहे.
उल्हास नदी दुथडी भरून वाहत आहे. मुसळधार पाऊस सतत सुरू राहिला तर नदी काठच्या झोपडपट्ट्या, चाळींमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे. खाडीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने कल्याण मधील गोविंदवाडी भागातील तबेले मालकांनी पाण्याच्या पातळीत वाढ झाली तर म्हशी नेहमीप्रमाणे गोविंदवाडी रस्त्याच्या मध्यभागी बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. डोंबिवली, कल्याण भागातून सकाळीच मुंबईच्या दिशेने कामावर गेलेले नागरिक घाटकोपर, कुर्ला भागात रेल्वे मार्गावर पाणी तुंबल्याने कामावर न जाता परतीच्या लोकलने घरच्या दिशेने परतले आहेत. रस्त्यावरील वाहनांची गर्दी तुरळक आहे.
बाजारपेठांमधील भाजीपाला, फळ विक्रेते गायब आहेत. डोंबिवली पश्चिमेत भरत भोईर नाला दुथडी भरून वाहत असल्याने जगदंबा माता मंदिर, गोपीनाथ चौक भागातील रस्त्यांना नद्यांचे रूप आले आहे.