ठाणे – शहरात सोमावरी सकाळपासून पावसामुळे आभाळ भरुन आले असून पावसाची रिपरीप सुरु आहे. जिल्ह्यातील इतर शहरातील पावसाची परिस्थिती पाहता आता आपल्या शहरातही मुसळधार पाऊस कोसळेल या भितीने अनेक रिक्षा चालकांनी ऐन सकाळच्या सुमारास घरची वाट धरली. त्यामुळे सकाळी ठाणे शहरात नोकरीसाठी येणाऱ्या नोकरदार वर्गाला रिक्षा मिळविण्यासाठी वणवण फिरावे लागल्याचे चित्र होते. तर, रिक्षा थांब्यावर देखील प्रवाशांची भल्ली मोठी रांग पाहायला मिळाली. दुपारच्या सुमारास देखील ही अशीच परिस्थिती दिसून आली.
ठाणे शहरात रविवार पासून आभाळ भरुन आले होते. काही क्षणात पाऊस कोसळेल असे वाटतं होते. परंतू, रविवारी दिवसभर पाऊस कोसळलाच नाही. सोमवारी मध्यरात्री पासून ठाणे शहरात पावसाची रिपरिप सुरु झाली होती. यादरम्यान काही काळ मुसळधार देखील पाऊस कोसळला. परंतू, सकाळी ६ वाजल्यापासून आभाळ दाटून आले आहे. सर्वत्र वातावरणात अंधार पसरला असून सकाळपासून शहरात रिपरिप पाऊस पडत आहे. यावातावरणामुळे काहीवेळात मुसळधार पाऊस कोसळेल असे अनेकांना वाटले म्हणून त्यांनी घराबाहेर पडणे टाळले.
तर, रिक्षा चालकांनी देखील घरची वाट धरल्याचे दिसून आले. मुसळधार पावसात शहरात ठिकठिकाणी पाणी साचते त्यात, रिक्षा अडकून राहतात. यात, रिक्षाचालकांचेही नुकसान होते. त्यामुळे अनेक रिक्षा चालकांनी घरची वाट धरली. परिणामी, ठाणे शहरात नोकरीसाठी विविध भागातून आलेल्या नोकरदार वर्गाचे रिक्षा मिळवताना चांगलेच हाल झाले. स्थानक परिसरातील गावदेवी भागात रिक्षा थांब्यांवर रिक्षा उपलब्ध नसल्यामुळे प्रवासी रिक्षा शोधण्यासाठी वणवण फिरताना दिसून आले. तर, काही रिक्षा थांब्यावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. ठाणे शहरात मुसळधार पाऊस नसतानाही, प्रवाशांना रिक्षा मिळत नसल्यामुळे प्रवासी वर्गातून संताप व्यक्त केला जात होता.