Dussehra Shopping Offers ठाणे – साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसरा या सणानिमित्त ठाणे शहरात गुरूवारी उत्साहाचे वातावरण होते. दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेकांचा सोने – चांदी, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, वाहन खरेदी करण्याकडे कल होता. तसेच विधीवत पूजा करण्यासाठी लागणारे पूजेचे साहित्य, हार, फुले, मिठाई या दुकानांमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र होते.
दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. बाजारात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. या दिवशी खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल असतो. ग्राहकांना आकर्षित करत खरेदीसाठी वळवण्याकरिता विविध प्रकारच्या सवलतींचा वर्षाव विक्रेत्यांकडून करण्यात येतो. यंदाही हे चित्र कायम होते. ठाणे शहरातील जांभळी नाका, गोखले रोड, राम मारुती रोड, गावदेवी परिसर, नितीन कंपनी या ठिकाणी नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. दसरा सणानिमित्त घरातील शस्त्रे, पुस्तके, रोजच्या वापरातील वस्तूंचे पूजन केले जाते. घराच्या दारावर आंब्याची पाने, शेतात पिकलेले धान्य यापासून तोरण तयार करून वाहनांवर किंवा घराच्या दारावर लावले जाते. हे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गुरूवारी सकाळपासूनच बाजारात गर्दी केली होती. तसेच वाहन खरेदीसाठी आधी नोंदणी करावी लागते. यामुळे अनेक नागरिकांनी महिनाभर आधीच नोंदणीकरून ठेवली होती.
सणाच्या दिवशी नोंदणी केलेली वाहने खरेदीसाठी मोठ्या दुकानांमध्ये गर्दी झाल्याचे दिसून आले. तसेच नाविण्यपुर्ण आकर्षक दागिन्यांची दसऱ्याच्या दिवशी खरेदी केली जाते. त्यामुळे दागिन्यांची पसंती, खरेदी करण्यासाठी सराफांच्या दुकानांमध्ये देखील गर्दी होती. याशिवाय, कपडे, इलेक्ट्राॅनिक उपकरणे विक्रीच्या दुकानदारांनी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. महिलांना विविध सवलती, कूपन, लकी ड्रॉ अशा विविध सवलती दिल्या जात असल्याने ठाण्यात आजूबाजूच्या शहरातील नागरिक खरेदीसाठी गर्दी करत होते.
फुलांना मागणी
दसऱ्याच्या दिवशी अनेक जण वाहन, घर तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करतात. त्याचबरोबर घराघरांत छोट्या पूजा पार पडतात. त्यासाठी हार, तोरण तसेच घरातील सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात झेंडू आणि शेवंतीच्या फुलांना सर्वाधिक मागणी होती. त्यामुळे झेंडू १५० रूपये किलो, शेवंती २०० रूपये किलो, मोगरा २४० रूपये किलोने विकला जात होता. त्याचबरोबर आंब्याची आणि आपट्याची पाने २० रूपये दराने विकले जात होते, तर भात आणि गोंडे फुल २० रूपये दराने विक्री केले जात होते.
– मिठाई खरेदी
प्रत्येक सणात खाद्य पदार्थांची रेलचेल सुरू असते. दसरा सणाचा गोडवा वाढवण्यासाठी मिठाईची दुकाने सजली आहेत. गोड पदार्थ खरेदीसाठी नागरिक मिठाईच्या दुकानात गर्दी करत होते. मिठाईमध्ये श्रीखंड, जिलेबी फाफडाला सर्वाधिक पसंती असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
दर वाढल्याने ग्राहक कमी
यंदा सोन्यामध्ये चैन आणि नेकलेसला सर्वाधिक मागणी आहे. महिनाभर आधीच वस्तूंच्या नोंदणी करण्यात आलेल्या आहेत. दसरा सणानिमित्त ५० टक्के नोंदणी झाली आहे. सोन्याचे दर वाढल्याने २२ टक्के ग्राहक कमी झाले. यंदा चोकर नक्षी असलेले नेकलेस नव्याने उपलब्ध इंद्रायणी नार्वेकर झाले आहेत.- महेंद्र संघवी, सराफ