|| विजय राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रंगबिरंगी आतषबाजी, तारपानृत्य, ढोलनाच आणि आदिवासी लोककलांचा आविष्कार

राज्यात प्रसिद्ध असलेला जव्हारचा शाही दरबारी दसरा उत्सव मोठय़ा उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. तारपानृत्य, ढोलनाच यांसह विविध लोककला सादर करत स्थानिकांनी मोठी मिरवणूक काढली. रंगबिरंगी आतषबाजी करत धूमधडाक्यात हा सण साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे यंदा ‘रावण दहन’ न करता समाजातील अपप्रवृत्तीचे दहन करण्यात आले.

विजयादशमीचा सण जव्हारमध्ये मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. ‘दरबारी दसरा’ असे त्यास संबोधतात. जव्हार नगरपरिषद आणि उत्सव समितीच्या वतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात येते. संध्याकाळी पाच वाजता जंगी मिरवणूक काढण्यात आली. विजय स्तंभापासून हनुमान पॉइंटपर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. जगदंबा मातेची आणि श्रीमंत राजे यशवंतराव महाराज यांच्या प्रतिमेचीही मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत तारपानृत्य, ढोलनाच, तूरनाच यांसह विविध लोककला सादर करण्यात आली. या उत्सवात जव्हारमधील हजारो रहिवासी सहभागी झाले होते.

आज कुस्त्यांचे सामने

दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी जव्हारमध्ये कुस्त्यांचे जंगी सामने होतात. गेल्या वर्षी महिला मल्लांची कुस्ती खेळवण्यात आली होती. जव्हार येथील जुना राजवाडा या ठिकाणी हे सामने होतात. हे सामने पाहाण्यासाठी पालघर, भिवंडी, ठाणे, नाशिक, इगतपुरी, घोटी या ठिकाणांहून अनेक मल्ल येतात. हे सामने पाहण्यासाठी जव्हारवासियांची मोठी गर्दी होत असते.

यंदा रावण दहन नाही

‘दरबारी दसरा’ उत्सवात दरवर्षी हनुमान पॉइंट येथे भलामोठा रावणाचा पुतळा उभारून त्याचे दहन केले जाते. यंदा मात्र ही प्रथा बाद करण्यात आली आहे. यंदा स्त्रीभ्रूण हत्या, बलात्कार, महिला अत्याचार अशा अपप्रवृत्तीच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यंदा रावण दहनाला स्थानिक आदिवासी संघटनांनी मोठा विरोध केला होता.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dussehra festival
First published on: 19-10-2018 at 01:48 IST