ठाणे – मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे नवरात्रीत अनेकांचा हिरमोड झाला. अशातच दसरा आला असूनही पाऊस कायम असल्याने बाजारपेठेतही पावसाचा परिणाम झाला आहे. पावसामुळे फुलांचे नुकसान झाले असून बाजारात भिजलेली फुले विक्रीसाठी दाखल होत आहेत. तसेच छोट्या व्यवसायिकांना विक्रीसाठी आणलेला माल पाण्यात भिजू नये यासाठी सतत पळापळ करावी लागत आहे.
ठाणे शहरातील जांभळी नाका, गोखले रोड, राम मारुती रोड, गावदेवी परिसर हे बाजारपेठेतील मुख्य ठिकाणे आहेत. या ठिकाणी सणानिमित्त विविध ग्रामीण भागातील महिला साहित्य विक्रीसाठी येत असतात. या महिला टोपलीमध्ये किंवा रस्त्यावर त्यांचे साहित्य मांडतात. यंदा देखील या महिला साहित्य विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.
दसरा या सणासाठी लागणारे हार, तोरण, फुले, फळे आणि घरगुती सजावटीच्या साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे. तसेच दसरा सण पारंपरिक स्वरूपात घराघरांत साजरा केला जातो. या दिवशी घरातील शस्त्रे, पुस्तके, रोजच्या वापरातील वस्तूंचे पूजन होते. घराच्या दारावर आंब्याची पाने, गोंडे फुल, शेतात पिकलेले धान्य यापासून तोरण तयार करून वाहनांवर किंवा घराच्या दारावर लावले जाते.
यंदा भिवंडी, वाडा, मुरबाड, बदलापूर परिसरातील विक्रेते हे साहित्य विक्रीसाठी ठाणे बाजारात दाखल झाले आहेत. आंब्याचे आणि आपट्याचे टहाळे १० रूपये दराने विकले जात आहेत, तर भात आणि गोंडे फुल २० रूपये प्रति टहाळा दराने खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
मात्र, यंदा दसरा सण आला तरी पावसाचा जोर कायम आहे. या पावसाच्या सरींमुळे ग्राहकांना बाजारात यायला अडचण होत आहे आणि विक्रेत्यांचा माल भिजत असल्यामुळे विक्रीवर परिणाम होत आहे. यंदा ग्राहकांची संख्या कमी झाली असल्याचे एका विक्रेत्याने सांगितले.
एकाच फुलाचे वेगवेगळे दर
दसरा या सणाच्या दिवशी अनेक जण वाहन, घर तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करतात. त्याचबरोबर घराघरांत छोट्या पूजा पार पडतात. त्यासाठी हार, तोरण तसेच घरातील सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात झेंडू आणि शेवंतीच्या फुलांचा वापर केला जातो. त्यामुळे झेंडू आणि शेवंतीच्या फुलांना ठाण्यातील बाजारात सर्वाधिक मागणी आहे.
मात्र, मागील काही दिवस राज्यभरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील फुलांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी फुले भिजली आहेत. त्यामुळे बाजारात भिजलेली फुले विक्रीसाठी येत आहेत. सध्या ठाणे बाजारात भिजलेल्या आणि सुक्या फुलांचे दर वेगवेगळे आहेत. भिजलेली झेंडूची फुले ६० ते ८० रूपये किलोने विक्री होत आहेत. तर, सुकी फुले १०० ते १५० रूपयांनी विक्री होत आहे. तसेच भिजलेली शेवंती २०० रूपये किलो आणि सुकी शेवंती ३०० रूपये किलोने विकली जात आहे.