ठाणे : ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाच्या कामामुळे धुळ आणि ध्वनी प्रदुषण होऊ नये यासाठी उपाययोजनांचा आराखडा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने शनिवारच्या बैठकीत सादर केला. मात्र, प्रत्यक्षात आराखड्याची अंमलबजावणी होत नसल्याने हा आराखडा म्हणजे धुळफेक असल्याचा सूर रहिवाशांनी यावेळी लावला. या मार्गामुळे नागरिकांचा प्रवास वेगवान होणार असला तरी या मार्गामुळे भविष्यात नागरिकांना वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागू नये यासाठी पुरेसा रस्ता उपलब्ध करून द्या, अशी जोरकस मागणीही रहिवाशांनी केली. दरम्यान, येथील रहिवाशांना नेमका रस्ता कसा हवा आहे आणि त्यांच्या इतर कोणत्या मागण्या आहेत, याचे सादरीकरण रहिवाशांचे शिष्टमंडळ पुढच्या बैठकीत सादर करतील, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

ठाणे-बोरिवली भुयारी मार्गासंदर्भात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने शनिवारी सकाळी मानपाडा भागातील अनंता बँक्वेट हाॅल येथे एक बैठक घेतली. या बैठकीला ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अभियंता विशाल जांभळे, पोलिस उपायुक्त प्रशांक कदम, मेघा इंजिनिअरींग कंपनीचे प्रतिनिधी यांच्यासह निळकंठ वुडस, निळकंठ ग्रीन, व्हेराटन, काॅसमाॅस लाउंज, सत्यशंकर या गृहसंकुलातील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्प नेमका कसा आहे, त्याच्या मार्गिका कशा जाणार आहेत, याचे सादरीकरण प्राधिकरणाने सादर केला. तसेच या प्रकल्पाच्या कामादरम्यान नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी धुळ आणि ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून त्याचाही आराखडा प्राधिकरणाने सादर केला. मात्र, त्यावर आक्षेप घेत धुळ आणि ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात नसल्याचे सांगत हा आराखडा म्हणजे धुळफेक असल्याचा सूर रहिवाशांनी यावेळी लावला. मागील बैठकीत खासदार म्हस्के यांनी धुळ आणि ध्वनी प्रदुषण आराखड्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिल्यानंतर काही दिवस त्याची अंमलबजावणी केली. त्यानंतर ,त्याची अंमलबजावणी बंद झाली. आता शनिवारी बैठकीच्या आदल्या दिवशी आरखड्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. त्यावर एमएमआरडीएचे अधिकारी निरुत्तर झाल्याचे दिसून आले. दरम्यान, आराखड्याची अंमलबजावणी करत नसल्याप्रकरणी ठेकेदाराला नोटीस देऊन त्याच्यावर दंडात्मक कारवाई करा, अशा सुचना खासदार म्हस्के यांनी यावेळी केल्या.

ठाणे-बोरिवली भुयारी मार्गामुळे नागरिकांचा वेगवान प्रवास होईल आणि नागरिक काही मिनीटात बोरिवलीत पोहचतील. पण, आम्ही मात्र कोंडीमुळे घरी वेळेत पोहू शकणार नाही, असा टोला नागरिकांनी यावेळी लगावला. गृहसंकुलातील वाहतूकीसाठी भुयारी मार्ग लगत ७ मीटरचा पोहच रस्ते तयार करण्यात येणार असल्याचे प्राधिकरणाने सांगितले. मात्र, हा रस्ता परिसरातील रहिवाशांसाठी पुरेशा नाही. भविष्यात येथे शाळेच्या बस, अग्निशमन वाहन, रुग्णवाहीका कशी येऊच शकणार नाही. त्यामुळे एमएमआरडीएने प्रस्तावित केलेला रस्ता पुरेसा ठरणार नसून तो युनी अबेक्स कंपनीपर्यंत नेण्यात यावा, अशी मागणी रहिवाशांनी यावेळी केली. तसेच जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवण्याची मागणीही रहिवाशांनी केली.

ठाणे-बोरिवली भुयारी मार्गामुळे भविष्यात मुल्लाबाग परिसरातील गृहसंकुलांमधील रहिवाशांना त्रास होऊ नये यासाठी रहिवाशांनीच एकत्रित चर्चा करून त्यांना कसा रस्ता हवा आहे, हे ठरवावे. त्यानंतर सर्व संकुलांमधून दोन ते तीन जणांनी नियुक्ती करून एक समिती करावी आणि त्या समितीमार्फत रस्त्याचा प्रस्ताव एमएमआरडीएपुढे मांडावा. यासाठी एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांच्यासोबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असे खासदार म्हस्के यांनी सांगितले.

मुल्लाबाग परिसरातील हरीत पट्टा पाहून आम्ही घरे खरेदी केली होती. भुयारी मार्गामुळे येथील वृक्षांवर कुऱ्हाड चालवून हरीत पट्टा नष्ट करण्यात आला, अशा भावना रहिवाशांनी व्यक्त केल्या. त्यावर भुयारी मार्गाच्या कामासाठी आवश्यक असलेली यंत्रणा नेण्यासाठी वृक्ष तोड करण्यात आली आहे. परंतु हा रस्ता तयार झाल्यावर काही ठिकाणी हरित पट्टे तयार केले जाणार असून त्याचबरोबर परिसरात वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे, असे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.