पूर्वीचे गायक वादक आपली कला आणि विद्या कोणी चोरू नये म्हणून ती लपवून ठेवायचे. आता मात्र कलेचा मुक्त आविष्कार नजरेस पडतो, असे मत सुप्रसिद्ध गायिका आशा खाडिलकर यांनी ठाण्यातील सहयोग मंदिर येथे व्यक्त केले.
श्री समर्थ शारदा सुगम संगीत संस्था आणि २२ श्रुती संस्था यांच्या वतीने रविवारी ठाण्यातील सहयोग मंदिर येथे कार्यपूर्ती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. विद्याधर ओक यांनी गेल्या दहा वर्षांतील २२ श्रुतींवर केलेल्या संशोधनाची ही कार्यपूर्ती होती. ‘‘पूर्वीचे गायक वादक आपली कला आणि विद्या कोणी चोरू नये म्हणून ती लपवून ठेवायचे, मात्र डॉ. ओक यांनी आपले संशोधन सर्वासाठी खुले केले आहे, ही विशेष बाब आहे,’’ अशी भावना खाडिलकर यांनी व्यक्त केली. खाडिलकर यांच्या हस्ते संस्कार प्रकाशनातर्फे प्रकशित होत असलेल्या ‘२२ श्रुती’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे आणि डॉ. विवेक बनसोड यांनी केलेल्या या पुस्तकाच्या हिंदी अनुवादाचे प्रकाशन करण्यात आले. त्याचप्रमाणे सदाशिव बाक्रे आणि डॉ. विद्याधर ओक यांनी लिहिलेल्या आणि पुण्याच्या राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित होत असलेल्या ‘श्रुतीविज्ञान व रागसौंदर्य’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी झाले.