कल्याण – कल्याण पूर्वेतील जनसेवा जयदुर्गा वसाहतीत शनिवारी संध्याकाळी घर परिसरात खेळत असलेल्या एका चार वर्षाच्या बालिकेवर सात ते आठ भटक्या श्वानांनी एकावेळी हल्ला करून बालिकेला गंभीर जखमी केले. भटक्या श्वानांनी भुंकण्याचा मोठा आवाज करत बालिकेवर आक्रमक होत हल्ला केला. बालिकेने बचावासाठी ओरडा केल्यानंतर रहिवाशांनी तिला श्वानांच्या तावडीतून सोडविले. अन्यथा तिच्या जीवावर बेतले असते, असे कुटुंंबीयांनी सांगितले.
जनसेवा जयदुर्गा वसाहतीत चंदू गुप्ता आपल्या कुटुंबीयांसह राहतात. शनिवारी संध्याकाळी चंदू गुप्ता यांची चार वर्षाची अर्पिता मुलगी घरा बाहेरील मोकळ्या जागेत खेळत होती. यावेळी त्या परिसरात आठ भटके श्वान फिरत होते. एका भटक्या श्वानाने अचानक अर्पितावर हल्ला करून तिला जमिनीवर पाडले. एका श्वानाने आक्रमक होत भुंकत हल्ला करताच परिसरातील इतर श्वान अर्पिताच्या दिशेने धावत येऊन त्यांनीही अर्पितावर हल्ला करून तिच्या सर्वांगाला चावे घेतले.
भटके श्वान तिला खाली पाडून ओढत नेत होते. यावेळी अर्पिता बचावासाठी मोठ्याने ओरडत होती. तिचा ओरडा ऐकून परिसरातील रहिवासी घराबाहेर आले. त्यांना अर्पिता गुप्ता हिच्यावर श्वानांनी हल्ला केल्याचे दिसताच त्यांनी काठ्या, दगडी फेकून श्वानांना अर्पितापासून दूर केले. अर्पिताची श्वानांंपासून सुटका केली. तिला तातडीने पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तिच्यावर तातडीने तेथे उपचार सुरू करण्यात आले.
कल्याण पूर्वेतील खडेगोळवली, कैलासनगर, विठ्ठलवाडी परिसरात मोकळ्या जागेत मटण, मांस विक्रीची अधिक संख्येने दुकाने आहेत. या दुकान परिसरात भटक्या श्वानांचा सर्वाधिक वावर असतो. एकाच जागी टाकाऊ मटण, मांसाचे तुकडे त्यांना खाण्यास मिळतात. उर्वरित वेळात भटके श्वान परिसरात फिरत असतात, असे परिसरातील रहिवाशांनी सांगितले.
कल्याण, डोंबिवली परिसरात सुमारे ८० हजाराहून अधिक भटके श्वान आहेत. गेल्या वर्षभरात पालिका हद्दीत सुमारे १४ हजार जणांना श्वान दंश झाल्याची पालिकेची माहिती आहे. त्यामुळे दर महिन्याला सुमारे नऊशे ते हजार लोकांना भटके श्वान दंश करत आहेत. पालिकेने भटक्या श्वानांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.