Eknath Shinde Thane News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये विस्तवही जात नाही. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्ते, नेते, पदाधिकाऱ्यांकडून एकमेकांवर टीकेचे बाण सोडले जातात. परंतु कितीही विरोध असला तरी उद्या घटनास्थापनेसाठी त्यांना एकत्र यावेच लागणार आहे. ते कशासाठी नेमके जाणून घेऊया.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर संपूर्ण राज्यभरात त्याचे पडसाद उमटले. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मोठ्याप्रमाणात पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक शिंदे यांच्यासोबत गेले. परंतु माजी खासदार राजन विचारे, आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्यासह विविध भागातील पदाधिकारी अद्यापही ठाकरे यांच्यासोबत आहेत. या दोन्ही गटामध्ये ठाण्यात विस्तवही जात नाही. आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत असतात. परंतु सोमवारी त्यांना इच्छा नसतानाही एकत्र यावे एकाच मिरवणूकीत यावे लागणार आहे. ठाण्याच्या टेंभीनाका येथील देवी मिरवणूकीत त्यांना एकत्र यावे लागणार आहे.
टेंभीनाका येथील देवीचे महत्त्व
- १९७८ मध्ये ठाण्यातील टेंभी नाका येथे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनखाली नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, विविध स्तरातील हितचिंतकांनी एकत्र येऊन या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. सामाजिक एकोपा वृध्दिंगत व्हावा, या निमित्ताने भावी तरुण पिढीवर संस्कार होऊन त्यांच्या विचारांना दिशा मिळावी, त्यांचे प्रबोधन व्हावे हा यासाठी हा नवरात्रौत्सवाचा प्रारंभ झाल्याचे शिवसैनिक सांगतात.
का दिसणार एकत्र ? - कळवा येथून देवीमुर्ती आणून मूर्तीची प्रतिष्ठापना टेंभीनाका येथील भवानी चौकात केली जाते. या मिरवणूकीत सर्व नेत्यांना, कार्यकर्त्यांना देवीचा रथ हाताने ओढून टेंभीनाका पर्यंत आणावा लागतो. रथ ओढण्यासाठी शिवसैनिक, ठाणेकर देखील गर्दी करतात. त्यामुळे या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिरवणूकीत एकत्र रथ ओढावा लागणार आहे.
यावर्षी काय आहे देखावा
- यावर्षीच्या सजावटीची लांबी ११० फूट आहे, तर रुंदी मागच्या बाजूला ४५ फूट आणि पुढच्या बाजूला ५५ फूट आहे. या देखाव्याची एकूण उंची साधारण ७५ फुटांपर्यंत पोहोचेल. या देखाव्यासाठी एकूण १२५ (सव्वाशे) खांब वापरले असून, प्रत्यक्षात २६ खांबामध्ये पाच खांब अंतर्भूत आहेत. या देखाव्याचे आर्किटेक्चर काम पूर्णपणे तमिळनाडू येथील प्रसिद्ध बृहदेश्वर मंदिराच्या आर्किटेक्चरवर आधारित आहे. त्या मंदिरातील शिवलिंगाची उंची २९ फूट असून, ते एकाच ग्रॅनाइटच्या दगडापासून बनले आहे. मंदिराच्या कळसाच्या भागात आणि आतल्या गाभाऱ्यामध्ये संपूर्ण चारधाम मंदिरांची माहिती आणि मंदिराची प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न करत आहोत. कलादिग्दर्शक अमन विधाटे यांच्या मार्गदर्शनाखाली देखाव्याचे काम सुरु आहे. प्रवेशद्वारावर २४ बाय २९ फुटाची भगवान शंकराची मूर्ती उभारण्यात आली असून ती २९ फुटी बृहदेश्वर मंदीराच्या शिवलींगाचे समानत्व साध्य करते. तिच्या आसपास चारधाम देवालये उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. हा देखावा तयार करण्याचे काम मागील अडीच ते तीन महिन्यांपासून सुरू आहे. सध्या जागेवर १२५-१५० लोक आणि बाहेर कास्टिंगसाठी मोल्डिंग, डिझानिंग असे मिळून एकूण २००-२५० कलाकार दिवस रात्र काम करत आहेत.