ठाणे : भारतीय लष्कराने पाकिस्तानला धडा शिकविला. यापूर्वी असे अनेक प्रसंग झाले. परंतु अशी कठोर भूमिका घेतली गेली नव्हती. पहलगाममध्ये आपल्या भगिनींचे कुंकु पुसण्याचे पाप ज्यांनी केले, त्यांना धडा शिकविण्याचे काम भारतीय लष्कराने केले. भारतीय लष्कराचे अभिनंदन करायला पाहिजे. पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

गिर्यारोहक शरद कुलकर्णी यांच्या अनुभवावर आधारित ‘ती, मी आणि पुनश्च एव्हरेस्ट’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. या पुस्तकाचे प्रकाशन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

कुलकर्णी यांचे गिर्यारोहणातील काम प्रेरणादायी आहे. वयाच्या ५० वर्षानंतर जगातील सात खंडातील अवघड शिखरे सर करण्याचा ध्यास कुलकर्णी यांनी घेतला. सतत १० वर्ष प्रयत्न करून वयाच्या ६० व्या वर्षी हे ध्येय पूर्ण केले, असेही शिंदे म्हणाले.

गिर्यारोहकांसाठी संस्था

गिर्यारोहकांसाठी एक संस्था करण्याची मागणी करण्यात आले. त्याचे प्रस्ताव तयार करा. हे काम देशभक्तीचे आहे. मी तुमच्या सोबत आहे. संस्था ठाण्यात करू, असे आश्वासनही शिंदे यांनी दिले.