Eknath shinde ठाणे : ग्रामीण भागांमध्ये इंटरनेट सक्षमपणे सुरू नसल्यामुळे तेथील कम्युनिकेशन होत नाही. परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएसएनएलच्या फोर जी सुविधेचा शुभारंभ केल्याने ग्रामीण भागाला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे या सुविधेच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी एक क्रांतीकारक पाऊल टाकले असून त्याचबरोबर मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
ठाणे येथील टिपटाॅप प्लाझा येथे स्वयम पुनर्वसन केंद्र आणि ठाणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्यावतीने शनिवारी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक साहित्य आणि उपकरण वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी बीएसएनएलच्या फोर जी सुविधेमुळे देशाला होणाऱ्या फायद्याबद्दल माहिती दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएसएनएसल फोज जी सुविधेचा शुभारंभ केला. या सुविधेसाठी देशभरात एक लाख मोबाईल टाॅवर उभारले जाणार असून त्यापैकी ९ ते १० हजार टाॅवर महाराष्ट्रात उभारले जाणार आहेत. अती दुर्गम भागातील शाळांमध्ये इंटरनेट सुविधा, नागरिकांना टेली मेडीसीन सुविधा पुरविणे आणि त्यांच्याशी कम्युनिकेशन ठेवणे, या बाबी फोर जी सुविधेमुळे उपलब्ध होणार असून यामुळे या सुविधेचा फायदा शहरासोबतच ग्रामीण भागांनाही होणार आहे, असे शिंदे म्हणाले.
शहरासोबतच ग्रामीण भागातील इंटरनेट सेवेत सुधारणा होईल आणि त्याचा फायदा दुर्गम ग्रामीण भागांना होईल. शिक्षण, दैनंदिन औषधोपचार आणि संपूर्ण जनतेला नेटवर्कचा फायदा होईल. देशाच्या सीमेवर सेवा देणाऱ्या सैनिकांनाही फायदा होईल. सुरक्षा मजबूत होईल आणि आपले सैनिक योग्य वेळी शत्रूला योग्य आणि योग्य उत्तर देऊ शकतील. म्हणूनच, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. आपला देश कम्युनिकेशनमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे, ही एक महत्त्वाची कामगिरी आहे. ही स्वावलंबी भारताकडे वाटचाल आहे, असे शिंदे म्हणाले. बीएसएनएलच्या फोर जी सुविधेच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी एक क्रांतीकारक पाऊल टाकले असून त्याचबरोबर मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे, असेही ते म्हणाले.