ठाणे : ठाणे आणि अयोध्येचे नेहमीच जिव्हाळ्याचे नाते राहीले आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कारसेवकांची एक मोठी आणि चांगली पिढी या टेंभी नाक्याने कारसेवेसाठी बहाल केली हा इतिहास आहे. त्याचे साक्षीदार आपण होतो. आजही हा ऐतिहासिक सोहळा कोण पहात असेल नसेल पण बाळासाहेब आणि आनंद दिघे जरुर हा सोहळा पहात असतील, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाणे येथे काढले.
टेंभी नाका येथील आनंद आश्रमात राम मंदिर उद्धाटन सोहळा पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना संबोधन केले. महाराष्ट्राचे आणि अयोध्येचे एक अध्यात्मिक नाते आहे. राम, लक्ष्मण, सितामाई वनसावात निघाल्या तेव्हा पंचवटी नाशिक येथे त्यांचा मुक्काम होता. त्यामुळे महाराष्ट्र आणि अयोध्या हे आगळवेगळ आणि जिव्हाळ्याचे नाते राहीले आहे. अयोध्येत उभ्या रहात असलेल्या राम मंदिराला लागणारे संपूर्ण सागवानाचे लाकूड आपल्या महाराष्ट्रातून जात आहे. ही भाग्याची, अभिमानाची, गौरवाची बाब आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
हेही वाचा…ठाण्यातील कोपीनेश्वर मंदीरात रामउत्सवाचा जल्लोष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली महाआरती
आज सगळीकडे राममय वातावरण झाले आहे. ५०० वर्षाचा वनवास संपुष्टात आला आहे. अत्यंत विलोभनीय अशा राम मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली आहे. आपल्या सर्वांचे स्वप्न साकार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी आभार मानतो, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. एखाद्या गोष्टीला, परंपरेची सुरुवात टेंभी नाक्यापासून होते आणि मग संपूर्ण देशात, महाराष्ट्रात ती गोष्ट पसरते असा अनुभव आहे. आपले उत्सव, परंपरा जपण्याचे काम आनंद दिघे यांनी केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना अभिप्रेत असलेले काम आपण करत आहोत, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. गावागावात, गल्लोगल्ली राम नामाचा जयघोष होत आहे. ही स्वप्नपुर्ती आहे, असे ते म्हणाले.