ठाणे : मालेगाव येथील २००८ च्या बाँबस्फोट खटल्यातून भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सातही जणांची निर्दोष सुटका झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ठाण्यात फलकबाजी केली. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही असा फलकावर मजकूर असून हे फलक ठाणे, नवी मुंबईत झळकत आहेत. बॅनरवर एका दिशेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तर दुसऱ्या बाजूला शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे, उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदे, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे छायाचित्र आहे.

शिवसेना शिंदे गटाचे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी हे डिजीटल फलक शहरातील मुख्य चौक, रस्त्यावर लावले आहेत. मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बाँबस्फोट खटल्यातून भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सातही जणांची निर्दोष सुटका झाली. या घटनेनंतर आता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भगवा दहशतवाद कधीच नव्हता असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. काँग्रेसने हिंदू समाजाची माफी मागावी असेही ते म्हणाले. या प्रकरणाचा निकाल लागताच, ठाणे, नवी मुंबई शहरात शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांचे फलक आता चौका-चौकात झळकत आहेत.

फलकावर काय?

– या फलकावर भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांचे छायाचित्र आहे. फलकावर एका दिशेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे, उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदे, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे आणि धनुष्यबाण आहे. तसेच म्हस्के, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांचे छायाचित्र असून म्हस्के यांनी निकाला बद्दल प्रज्ञा सिंह ठाकूर आणि पुरोहित यांना शुभेच्छा दिल्या आहेत. निर्दोष मुक्तता झालेल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन असा उल्लेख असून सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं असाही उल्लेख आहे.