ठाणे: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिवसभरात ठाणे, अंबरनाथ, मुंबई, शिर्डी आणि अकोले अशा विविध ठिकाणांचा दौरा केला. न्यायालयाचे उद्घाटन, धार्मिक दर्शन, विकासकामांची उद्घाटने आणि जनसभेत सहभाग अशा अनेक कार्यक्रमांनी त्यांचा दिवस गजबजलेला होता. यासाठी त्यांनी हेलिकॉप्टर, विमानाचा वापर केला. त्यांच्या या धावत्या दौऱ्याची समाज माध्यमांवर चर्चा रंगली होती.

एकनाथ शिंदे हे त्यांच्या व्यस्त आणि दिवस रात्रीच्या दौऱ्यासाठी ओळखले जातात. एखाद्या दिवशी सकाळी सहा वाजता निघून रात्री १- २ वाजता एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी गणपती दर्शनासाठी जाण्यासही शिंदे मागे पुढे पाहत नाही. त्यामुळे त्यांच्या प्रवासाची कायमच चर्चा रंगत असते. आजही शिंदे यांच्या दौऱ्याची अशीच चर्चा रंगली होती. शिंदे यांच्या दिवसाची सुरुवात ठाणे येथून झाली. तेथून त्यांनी हेलिकॉप्टरने थेट अंबरनाथ येथे प्रस्थान केले. अंबरनाथ न्यायालयाचे उद्घाटन करून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. या छोट्या अंतरासाठी हेलिकॉप्टरचा वापर केल्याने सोशल मीडियावर काहींनी टीका केली. मात्र, त्यानंतरही शिंदे यांनी पुन्हा अंबरनाथ ते जुहू असा हेलिकॉप्टर प्रवास केला.

जुहू हेलिपॅडवरून ते मुंबई विमानतळावर गेले आणि विमानाने शिर्डी विमानतळ गाठले. शिर्डीहून हेलिकॉप्टरने ते अकोले, जिल्हा अहिल्यानगर येथे पोहोचले. अगस्ती सहकारी कारखाना हेलिपॅडवर आगमनानंतर त्यांनी मोटारीने अगस्ती ऋषी मंदिराकडे प्रस्थान केले. मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी प्रवरा नदी पुलावरील विकासकामाचे उद्घाटन केले. यानंतर अकोले बाजारतळ येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त काढलेल्या भव्य रॅलीत आणि जाहीर सभेत ते सहभागी झाले. पुढील कार्यक्रम म्हणून त्यांनी आनंदगड, वीरगाव येथील धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला भेट देऊन कोनशिला समारंभ पार पाडला.

दिवसाच्या अखेरीस, ते पुन्हा अगस्ती सहकारी कारखाना हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरने शिर्डी विमानतळावर गेले आणि तेथून विमानाने मुंबईकडे परतले. मुंबईत परतल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. विशेष म्हणजे शिंदे यांनी आपल्या दिवसाच्या दौऱ्याची सुरुवात ज्या अंबरनाथ शहरातून केली होती. त्याच अंबरनाथ शहराच्या मनसे पदाधिकारी यांच्या प्रवेशाला शिंदे उपस्थित होते. त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

या धावत्या दौऱ्यात शिंदे यांनी न्यायव्यवस्था, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आदिवासी समाजाच्या विकासाशी संबंधित कार्यक्रमांना हजेरी लावली. पक्षाच्या कार्यक्रमालाही ते हजर होते. त्याच्या या धावत्या दौऱ्याने सर्वच कार्यक्रम स्थळावरील उपस्थित आश्चर्य व्यक्त करत होते.