कल्याण : श्रावणी सोमवार निमित्त सोमवारी कल्याणमधील एक वृध्द महिला आपल्या कुटुंबीयांसमवेत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भीमाशंकर येथे शिवशंकराच्या दर्शनासाठी गेली होती. मंदिरासह परिसरात भाविकांची अलोट गर्दी होती. या गर्दीतून दर्शन रांगेतून ‘डाकिन्या’ शिवशंकराचे दर्शन घेत असताना वृध्द महिलेच्या हातामधील ८० हजार रूपये किमतीची सोन्याची बांगडी चोरीला गेली आहे.

भीमाशंकर मंदिर परिसरात आणि मंदिर गर्भगृहात भाविकांची दर्शनासाठी श्रावण महिन्यात झुंबड असते. श्रावणी सोमवार असला की मंदिर परिसर भाविकांनी गजबजून गेलेला असतो. कल्याण पश्चिमेतील खडकपाडा भागातील संदीप हाॅटेल परिसरात कुटुंबीयांसह राहणाऱ्या राजाबाई शिवाजी कदम (७५) आपल्या कुटुंबीयांसमवेत सोमवारी (ता.११ ऑगस्ट) श्रावणी सोमवार निमित्त भीमाशंकर येथे शिवशंकराच्या दर्शनासाठी पहाटेच्या वेळेत गेल्या होत्या. दर्शनासाठी मंदिराबाहेर लांबलचक रांग होती. मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता. पावसाची रिपरिप सुरू होती.

कदम कुटुंबीय दर्शन रांगेतून मंदिरात दर्शनासाठी जात होते. भाविक पुढे सरकत होते. त्याप्रमाणे रांग पुढे जात होती. दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान कदम कुटुंबीय मंदिर परिसरात दर्शनासाठी पोहचले. तोपर्यंत गर्दीचा कहर झाला होता. मंदिर गर्भगृहात भागात आल्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी उड्या पडत होत्या. राजाबाई कदम (७५) या वृध्दा मंदिरातून दर्शन घेऊन कुटुंबीयांसह बाहेर पडल्या. त्यांच्या हातात सोन्याच्या बांगड्या होत्या. मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर सुस्थितीत झाल्यावर राजाबाई कदम यांना आपल्या डाव्या हातामधील सोन्याची बांगडी गायब असल्याचे आढळले.

कदम कुटुंबीयांनी मंदिर परिसरात, दर्शन घेतलेल्या भागात जाऊन तपासणी केली. त्यांना कुठेही सोन्याची गहाळ झालेली बांगडी आढळून आली नाही. गर्दीचा गैरफायदा घेऊन अज्ञात चोरट्याने आपली सोन्याची बांगडी हात चलाखीने काढून घेतली असल्याचा संशय राजाबाईंना आला. ८० हजार रूपये किमतीची सोन्याची बांगडी गेल्याने कुटुंबीय व्यथित झाले. त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्याची माहिती नसल्याने कल्याण येथे येऊन पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे गुरुवारी या चोरीप्रकरणी राजाबाई कदम यांच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. हा गुन्हा खेड तालुक्यातील असल्याने खडकपाडा पोलिसांनी हा गुन्हा खेड तालुक्यातील खेड पोलिसांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे तपासासाठी पाठविला आहे. भीमाशंकर मंदिराची हद्द येत असलेले पोलीस ठाणे याप्रकरणाचा तपास करत आहे.

श्रावणात भीमाशंकर येथे राज्याच्या विविध भागातून भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे या भागात भुरट्या चोऱ्यांचा नेहमीच उपद्रव होत असल्याच्या भाविकांच्या तक्रारी आहेत. पाकीटमार, मोबाईल चोरी, महिलांच्या हातामधील पैशांचे बटवे गहाळ करण्याचे प्रकार या भागात श्रावण महिन्यात अधिक होतात, असे भाविक सांगतात.