ठाणे जिल्ह्यात ५० ठिकाणी केंद्रे

ठाणे : करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सोमवारपासून १५ ते १८ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात झाली. या युवा वर्गाने पहिल्याच दिवशी  लसीकरण मोहिमेला जोरदार प्रतिसाद देत लसीकरणासाठी गर्दी केली. जिल्ह्यात ४० ते ५० लसीकरण केंद्रांवर हे लसीकरण सुरू आहे. काही ठिकाणी तर पालक आणि मुले अशा दुहेरी रांगा लसीकरण केंद्रावर पाहायला मिळाल्या. करोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन या विषाणूचा वेगाने होत असलेला संसर्ग या पार्श्वभूमीवर १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सोमवारपासून सर्वत्र ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. या मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन लस वापरण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातही ४० ते ५० लसीकरण केंद्रांवर या वयोगटातील मुलांचे लसीकरण सोमवारपासून सुरू करण्यात आले आहे. आरोग्य केंद्र, उपकेंद्र, शाळा तसेच महाविद्यालयात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. ठाणे शहरात एकूण १४ केंद्रांवर लसीकरण मोहीम सुरू आहे. ठाण्यातील वर्तकनगर भागातील ब्राह्मण शिक्षण मंडळ संचालित माध्यमिक शाळेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या  लसीकरण केंद्रावर या शाळेसह इतर तीन शाळेतील विद्यार्थ्यांचेही लसीकरण करण्यात येत आहे. या केंद्रावर दिवसाला २०० ते २५० मुलांना लस देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती वर्तक नगर भागातील ब्राह्मण विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वर्षां हर्दास यांनी दिली.

लसीकरण केंद्रांवर पहिल्या दिवशी मुलांसह पालक देखील उपस्थित होते. काही विद्यार्थ्यांमध्ये लस घेण्याविषयी संभ्रम असल्याचे दिसून आला. कल्याण-डोंबिवली शहरात एकूण सहा केंद्रावर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या शहरात महापालिकेच्या लसीकरण केंद्र व्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे. यासाठी शाळा तसेच महाविद्यालय प्रशासनाला १५ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांची यादी तयार करून महापालिका आरोग्य विभागास द्यायची आहे. आरोग्य विभागाकडून त्या शाळेला किंवा महाविद्यालयाला लसीकरण मोहीमेची तारिख ठरवून दिली जाणार आहे. त्यानुसार, पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या पथकामार्फत शाळा किंवा महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. भिवंडी शहरातही  चार लसीकरण केंद्रांवर १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरात अनुक्रमे सहा आणि पाच केंद्रावर या वयोगटातील मुलांसाठी शाळा तसेच आरोग्य केंद्रावर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. तर, बदलापूर पालिकेतील शाळांचे लसीकरणासाठी कोणतेही नियोजन झाले नसल्यामुळे या शहरातील केवळ एका केंद्रावर १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची सुविधा करण्यात आली. मात्र, या केंद्राबाबतही पुरेशी माहिती दिली नसल्यामुळे येथे लाभार्थीची गर्दी कमीच होती. ठाणे ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यात एकूण दहा केंद्रांवर या वयोगटासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या भागातील मुलांचाही लसीकरणासाठी उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तर, जिल्हा रुग्णालयातही या वयोगटातील मुलांची लसीकरणासाठी गर्दी झालेली दिसून आली. यामध्ये ५० टक्के ऑनलाइन पद्धतीने तर, ५० टक्के ऑफलाइन पद्धतीने मुले लस घेण्यासाठी आले होते.