Thane Municipal Corporation : ठाणे : ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन आणि आरोग्य विभागातील एकूण १७७३ रिक्त पदांकरीता भरती प्रक्रीया राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून यानुसार उद्या, मंगळवारपासून इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. या भरती प्रक्रीयेसंदर्भात भाजपचे ठाणे महापालिकेतील माजी गटनेते नारायण पवार ( Narayan Pawar) यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र पाठविले असून त्यात स्थानिक उमेदवारांबाबत महत्वाची आठवण करून दिली आहे.
एकीकडे शहराचे नागरीकरण वाढत असून या नागरिकांना मूलभूत सेवासुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने आकृतीबंधमध्ये ८८० वाढीव पदांना मंजुरी दिली. पण, ही भरती काही कारणास्तव होऊ शकलेली नव्हती. त्यातच अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सेवानिवृत्त झाले आहेत. यामुळेच पालिकेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यानेच सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा दुहेरी ताण वाढला होता. दरम्यान, ठाणे महापालिकेने आता रिक्त पदांकरीता भरती प्रक्रीया राबविण्याचा निर्णय घेतला असून यानुसार, सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन आणि आरोग्य विभागात एकूण १७७३ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रीयेसंदर्भात भाजपचे ठाणे महापालिकेतील माजी गटनेते नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र पाठविले.
ठाणे महापालिका प्रशासनातील १ हजार ७७३ पदांसाठी होणाऱ्या या जाहिरातीसाठी २ सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करावे लागणार आहेत. यापूर्वी महापालिकेत २०१७ मध्ये वाहनचालक, इलेक्ट्रिक चेकर, पाणी खात्यातील विविध पदांसाठी भरती करण्यात आली होती. त्यात ठाणे महापालिकेच्या परिसरातील एकाही बेरोजगार तरुण-तरुणीची निवड झाली नव्हती. त्यावेळी झालेल्या लेखी परीक्षेत पदाचा आणि कामाचा काहीही संबंध नसलेले प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नावर ठाणे महापालिकेच्या महासभेत भाजपाचे तत्कालीन ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी आवाज उठविला होता. त्याला शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडूनही साथ मिळाली होती. त्यानंतर महापालिकेच्या महासभेत स्थानिक उमेदवारांना नोकरभरतीत ५० टक्के प्राधान्य देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला होता. या प्रस्तावाला तत्कालीन सभागृह नेते आणि विद्यमान खासदार नरेश म्हस्के यांनी अनुमोदन दिले होते. या पार्श्वभूमीवर यंदा नोकरभरतीसाठी २० जुलै २०१७ मध्ये महासभेत झालेल्या या ठरावाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी नारायण पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
शुल्कात कपात करावी
या भरतीसाठी बेरोजगार तरुण-तरुणींकडून मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले जातील. या भरतीसाठीच्या परीक्षा शुल्कासाठी अमागास प्रवर्गासाठी १ हजार रुपये आणि मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्गासाठी ९०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. अर्जदार बेरोजगारांमध्ये सामान्य कुटुंबातील तरुण-तरुणींचा समावेश असतो. ते बेरोजगारांवर अन्यायकारक आहे. मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्गासाठी निश्चित केलेले ९०० रुपये शुल्कही अवास्तव वाटते. तरी या प्रश्नाबाबत सहानुभूतीने निर्णय घेऊन अमागास प्रवर्गासाठी १ हजारांऐवजी ५०० रुपये आणि मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्गासाठी ९०० ऐवजी ३०० रुपये शुल्क ठेवावे, अशी मागणी नारायण पवार यांनी केली आहे.
ठाणेकर बेरोजगारांची उपेक्षा
ठाणे महापालिकेतील विविध पदांसाठी ८ वर्षांपूर्वी २०१७ मध्ये भरती झाली होती. त्यावेळी झालेल्या भरतीत ठाणे महापालिका क्षेत्रातील एकाही बेरोजगार तरुण-तरुणीची निवड झाली नव्हती. त्यामुळे त्यावेळच्या भरतीत ठाण्यातील बेरोजगारांची उपेक्षा झाली होती. त्यावेळच्या भरतीतील अनेक तरुणांची आता भरतीसाठीची वयोमर्यादा उलटली आहे. दरम्यान, आठ वर्षांपुर्वी झालेल्या भरती प्रक्रीयेत ठाणे महापालिका क्षेत्रातील एकाही तरुणाला नोकरी मिळाली नव्हती. यामुळे या भरती प्रक्रियेत स्थानिकांकरीता ५० टक्के जागा राखीव ठेवण्याची मागणी भाजपने केली आहे.