ठाणे : महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना १८ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर झाले असून याबाबत कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी गुरुवारी सायंकाळी घेतलेल्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांच्याबरोबर ऑनलाइनद्वारे चर्चा करून ही घोषणा केली. गेल्यावर्षीपेक्षा यंदा अडीच हजार रुपये जास्त रक्कम कर्मचाऱ्यांना मिळाली असून त्यामुळे त्यांची दिवाळी गोड होणार आहे. या निर्णयामुळे, ठाणे महापालिकेवर सुमारे १४ कोटी इतका अतिरिक्त भार पडणार आहे.
हेही वाचा >>> डोंबिवलीतील भागशाळा मैदानातील उत्सवी कार्यक्रमांना नागरिकांचा विरोध ; स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवर ८ हजार २७८ कायस्वरूपी अधिकारी आणि कर्मचारी आहेत, तर अडीच हजारांच्या आसपास कंत्राटी कामगार आहेत. करोना संकटामुळे महापालिकेचे जमा-खर्चाचे गणित बिघडले असून यामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. परंतु करोनाकाळात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांना १५,५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. अशाचप्रकारे यंदाही ठाणे महापालिकेतील मान्यताप्राप्त मुनिसिपल लेबर युनियनचे अध्यक्ष रवी राव यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान अदा करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. मात्र, त्याबाबत प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आला नव्हता.
हेही वाचा >>> ठाणे एसटीकडून दिवाळीनिमित्त प्रवाशांसाठी खास सोय; १५ ते ३० ऑक्टोबर दरम्यान धावणार २० जादा बसेस
दरम्यान युनियनचे अध्यक्ष रवी राव आणि उपाध्यक्ष मोहन तिवारी यांनी गुरुवारी सायंकाळी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळणेबाबत चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेऊन आयुक्त अभिजीत बांगर यांच्याबरोबर ऑनलाइन बैठक घेऊन चर्चा केली. या बैठकीला, माजी महापौर नरेश म्हस्के, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे हेही उपस्थित होते.ब्या बैठकीतील चर्चेनंतर अठरा हजार रुपये सानुग्रह अनुदान मंजूर केल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले. तर, पालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही गेल्या वर्षीप्रमाणेच एक महिन्याचे वेतन सानुग्रह अनुदान म्हणून दिले जाणार आहे, अशी माहिती म्युनिसिपल लेबर युनियनचे चिटणीस चेतन आंबोणकर यांनी दिली. मागील दोन वर्षे कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात वाढ केलेली नव्हती. त्या पार्श्वभूमीवर, महापालिकेवर अतिरिक्त भार पडला तरी वाढ करायलाच हवी, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी १८ हजार रुपये इतके सानुग्रह अनुदानावर शिक्कामोर्तब केल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा >>> विश्लेषण : ‘आदिपुरुष’वर खरंच बंदी घातली जाऊ शकते का? सेन्सॉर बोर्डचे नियम जाणून घ्या
ठाणे महापालिका आणि ठाणे परिवहन उपक्रम यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त १८ हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच ऑक्टोबर अखेरीस असलेली दिवाळी लक्षात घेऊन चालू ऑक्टोबर महिन्याचा पगार २० ऑक्टोबरपूर्वी करावा. त्यात विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्या पद्धतीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्याचे ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.