ठाणे: बुधवारी खोणी येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे हे शिळफाटा रस्त्यामार्गे पलावा पुलावरून काटई या रस्त्याने येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू असून, या निमित्ताने मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी सोशल मीडियावरून पुन्हा एकदा शिंदे यांच्यावर सणसणीत टीकास्त्र सोडले आहे. पलावा पुलाची गेल्या काही दिवसात दुरावस्था झाली होती. त्यामुळे पूल असूनही कोंडीचा सामना करावा लागत होता. त्यावरून राजू पाटील यांनी शिंदे पिता पुत्रांवर अनेकदा टीका केली आहे.
डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर भागातून मुंबई, नवी मुंबई, ठाणे असा प्रवास करण्यासाठी शिळफाटा रस्ता महत्वाचा आहे. मात्र येथील डोंबिवली मानपाडा परिसरात सुरू असलेले मेट्रो काम, काटई येथे रस्त्याची दुरावस्था, पलावा येथील अर्धवट पूल आणि जो पुलाचा भाग तयार आहे त्याची दुरावस्था यामुळे येथून वाहन चालकांना मोठ्या कोंडीचा सामना करावा लागतो. त्यावरून माजी आमदार राजू पाटील यांनी वारंवार शिंदे पिता पुत्रांवर टीकास्त्र सोडले आहे.
पुढे शिळफाटा, कल्याण फाटा येथेही कोंडी वेगळी नाही. त्यामुळे दररोज हजारो वाहनचालकांना येथे अडकून पडावे लागते. त्यामुळे नागरिकात संतापाचे वातावरण आहे. त्यात पलावा येथील पुलाची उदघाटनापासून दुरावस्था आहे. त्यामुळे येथे काही अपघातही झाले. त्याविरुद्ध जनतेत रोष आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी पुन्हा एकदा फेसबुक पोस्ट करत टीका केली आहे.
राजू पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट करत लिहिले आहे की, “मा. श्री. एकनाथ शिंदे जी असेच वारंवार या रस्त्यावरून येत रहा, किमान आपल्या धाकाने आमचे रस्ते व वाहतूककोंडीची समस्या आपणांस कळेल व त्यात सुधारणा होईल. हा टोमणा नाही तर आपणांस विनंती आहे. मात्र आपण जर दर पंधरा दिवसांनी या मार्गाने येणार असाल, तर आम्ही आपल्या स्वागताचे बॅनरही लावू! (हा टोमणा आहे बरं!)”
या पोस्टमधून पाटील यांनी या परिसरातील नागरिकांच्या रोजच्या वाहतूक कोंडी व रस्त्यांच्या दुर्दशेचा मुद्दा मांडला आहे. स्थानिक जनतेला रोजच्या प्रवासात प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यापूर्वीही राजू पाटील यांनी सोशल मीडियावरून व्हिडिओ व्हायरल करत स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती. आता पुन्हा फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी सरकार व प्रशासनाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले आहे.
स्थानिकांमध्ये शिंदे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती केली जाते, पण कायमस्वरूपी तोडगा मात्र निघत नाही, अशी भावना असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळेच राजू पाटील यांची ही फेसबुक पोस्ट लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.