गाडय़ा पारसिक बोगद्याऐवजी कळवा, मुंब्रा रेल्वे स्थानकातून

ठाणे : ठाणे ते दिवा या पाचव्या सहाव्या मार्गिकेसाठी रविवारी ठाणे ते दिवा मार्गिकेवर मेगाब्लॉक घेण्यात आला होता. या मेगाब्लॉक दरम्यान मध्य रेल्वेने कल्याणच्या दिशेने जाणारी जलद मार्गिका कळवा, मुंब्रा मार्गे कार्यान्वित केली आहे. त्यामुळे आता कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या जलद उपनगरीय रेल्वे गाडय़ा या पारसिक बोगद्याऐवजी कळवा, मुंब्रा रेल्वे स्थानकातून धावणार आहेत. तर फेब्रुवारीत होणाऱ्या ७२ तासांच्या मेगाब्लॉक दरम्यान दिवा येथून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जलद मार्गिकेचेही काम केले जाणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उपनगरीय प्रवाशांना रेल्वे वेळापत्रकाच्या रखडपट्टीतून मोठा दिलासा मिळणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे ते दिवा येथील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी मध्य रेल्वे प्रशासन आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून सुरू आहे. त्यासाठी रविवारी १४ तास मेगाब्लॉक घेण्यात आला होता.   रविवारी दुपारी कळवा, मुंब्रा स्थानकामधून जाणाऱ्या धिम्या मार्गिकेच्या रेल्वे रुळालगत असलेल्या रेल्वे रुळांवरून रिकामी जलद उपनगरीय रेल्वेगाडी प्रायोगिक तत्त्वावर धावली. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर रविवारी सायंकाळपासून मुंबईहून कल्याण, डोंबिवलीच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जलद उपनगरीय रेल्वेगाडय़ा पारसिक बोगद्याऐवजी कळवा, मुंब्रा येथील रेल्वे स्थानकांमधून धावण्यास सुरुवात झाली आहे. तर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जलदगाडय़ा सध्या पारसिक बोगद्यातूनच धावतील.