अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेत कंत्राट पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, नगरपालिकेची कुठलीही परवानगी न घेता कंत्राटदाराकडून पालिकेचे बोधचिन्ह असलेली ओळखपत्रे देण्यात आल्याचे उघड झाले आहे. या ओळखपत्रांवर नोंदणी क्रमांक किंवा अधिकृत स्वाक्षरी नाही. त्यामुळे ही ओळखपत्रे पूर्णपणे अनधिकृत ठरली आहेत. त्यामुळे याच ओळखपत्रांचा वापर करून तोतया पालिका कर्मचारी शहरात काही चुकीच्या गोष्टी तर करत तर नाहीत ना असा संशय व्यक्त होतो आहे.
काही दिवसांपूर्वी अंबरनाथ पालिकेत दोन कंत्राटदारांच्या टोळ्यांमध्ये कंत्राटाच्या वादातून प्रवेशद्वाराजवळील आतील भागात हाणामारी झाली होती. या घटनेनंतर पालिकेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर पालिका प्रशासनाने अशा गर्दीवर नियत्रंण ठेवण्यासाठी पाऊले उचलली. त्यात अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी सुरक्षा रक्षक म्हणून तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षा रक्षकांकडून गेल्या काही दिवसांपासून ओळखपत्र तपासणी सुरू असताना, या प्रक्रियेतूनच बनावट ओळखपत्रांचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
लेखा, संगणक तसेच इतर विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंत्राटदाराने अधिकृत परवानगी किंवा कागदोपत्री प्रक्रिया न राबवता ओळखपत्रे तयार करून दिली आहेत. ही बाब समोर आल्यानंतर संबंधित विभागातील अधिकारी या बाबतीत पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे किती ओळखपत्रे तयार झाली आहेत आणि त्यांचा वापर केवळ कंत्राटी कर्मचाऱ्यांपुरता आहे का, की शहरात बनावट कर्मचारी म्हणून या ओळखपत्राचा गैरवापर करत आहेत का असा संशय व्यक्त केला जात आहे.
मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांना याबाबत विचारले असता, हा अतिशय चुकीचा प्रकार आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल. सर्व ओळखपत्रे ताब्यात घेऊन कंत्राटदारावर कारवाई केली जाईल. पालिकेची परवानगी घेऊन, अधिकृत स्वाक्षरी असलेल्या मर्यादित ओळखपत्रांचाच कंत्राटी कर्मचारी वापर करू शकतील, असे ते म्हणाले.