कल्याण – शासनाने ई पीक पाहणी आता शेतावर जाऊन आपल्या मोबाईलवरील ई पीक पाहणी उपयोजनातून (ॲप) करण्याच्या सूचना केल्या आहेत. अशी शेतीची स्थळ दर्शक ई पीक पाहणी शेतकऱ्याने केली नसेल तर त्याला शेतीविषयक शासनाकडून मिळणारे लाभ, भरपाई मिळणार नाही, असे सूचित केले आहे. परंतु, ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागात सततचा मुसळधार पाऊस, त्यात मोबाईलला नसलेले नेटवर्क आणि शेतावर जाऊन मोबाईलवर स्थळ दर्शक छायाचित्र घेऊन ते शेतावर उभे राहून ई पीक उपयोजनावर स्थापित करण्यास अनेक शेतकऱ्यांना जमले नाही. या सर्व प्रक्रिया करणे शक्य होत नसल्याने आणि दुर्गम भागात मोबाईलला नेटवर्क नसल्याने ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड, शहापूर, कसारा पट्ट्यातील अनेक शेतकरी स्थळ दर्शक ई पीक पाहणीपासून वंचित आहेत.

यापूर्वी दरवर्षी शेतकरी जवळील आपल्या मालकी हक्क्याच्या नोंद असलेल्या शेती विषयक खाते पुस्तिका गावातील तलाठी कार्यालयात नेऊन ग्राम विकास अधिकारी (तलाठी) कडून पीक पाण्याची नोंद करत होता. मागील तीन ते चार वर्षापासून शेतकरी शासनाच्या कृषी विभागाच्या सूचनेप्रमाणे ई पीक पाहणी उपयोजन आपल्या मोबाईलमध्ये स्थापित करत होते. या उपयोजन माध्यमातून शेतावर न जाता घरबसल्या आपल्या मालकी हक्क्याच्या शेतीची ई पीक पाहणी नोंद करत होता. या ई पीक पाहणीमध्ये आपण लागवडीच्या शेतात कोणत्या पीकाची लागवड केली आहे. माळरानावरील पीकांची लागवड, अशी माहिती शेतकरी आपल्या परिचित किंवा तलाठी कार्यालयात जाऊन तलाठ्याच्या साहाय्याने भरून घेत होता.

गेल्या वर्षापासून शासनाने शेतकऱ्याने ई पीक पाहणी आपल्या शेताच्या बांधावर, शेतात जाऊन करायची आहे असे सूचित केले आहे. शेतकरी शेतीची स्थळ दर्शक ई पीक पाहणीची प्रतिमा ई पीक पाहणी उपयोजनवर स्थापित करत नाही तोपर्यंत ई पीक पाहणीची यशस्वी नोंद होत नाही.

ठाणे शहापूर, मुरबाड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या डोंगर उतारावरील शेतात जाऊन ई पीक पाहणीची नोंद करण्याचा प्रयत्न केला. त्यांना तेथे मोबाईलला नेटवर्क नसल्याने ई पीक पाहणीची नोंद करता आली नाही. काही नोकरदार शेतकरी आपल्या गाव, शेतीपासून नोकरीनिमित्त बाहेरगावी आहेत. त्यांना या स्थळदर्शक ई पीक पाहणीमुळे ई पीक पाहणीची नोंद करता आली नाही.

ऑनलाईन माध्यमातून जो शेतकरी ई पीक पाहणीची नोंद करणार नाही त्याला कृषी विषयक कोणतेही शासन लाभ मिळणार नाहीत. शासनाने शेतकऱ्यांना स्थळ दर्शक ई पीक पाहणीचा होणाऱ्या त्रासाचा विचार करून ही ई पीक पाहणी घरबसल्या, सहज पध्दतीने करता येईल यादृष्टीने कृषी, महसूल विभागाला सूचना करण्याची मागणी शेतकऱ्यांननी केली आहे.

अधिक माहितीसाठी शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे, मुरबाड तहसीलदारांना संपर्क साधला. तो होऊ शकला नाही. कृषी विभागाचे जिल्हा कृषी अधक्षक रामेश्वर पाचे यांनी ई पीक पाहणी प्रक्रिया महसूल विभाग पाहतो असे सांगितले.