tvlog05शहरात आपण ज्या गृहसंकुलात राहतो, तेथील वातावरण प्रसन्न व आरोग्यदायी करणे काही अंशी आपल्या हाती असते. झाडांची लागवड करून आपण चांगले वातावरण राखू शकतो. सोसायटीत, बंगल्यात, आजूबाजूस बरीच जागा उपलब्ध असते. त्यात आपण निरनिराळी सुगंधी, औषधी वनस्पती तसेच भाजीपाल्याची लागवड करू शकतो. या वनस्पतींमुळे हवा शुद्ध होते. वातावरण थंड व सुगंधित होते. सध्याच्या ग्लोबल वॉर्मिगच्या समस्येचे निवारण करण्यासाठी वृक्षांची जोपासना खूपच लाभदायक ठरते. दुसरा फायदा म्हणजे आरोग्यदायी आहारासाठी भाजीपाला, फळे मिळतात. आवार स्वच्छ आणि सुंदर होईल. ज्येष्ठ नागरिकांना नवनिर्मितीचे काम मिळाल्याने त्यांचा वेळ मजेत जाईल. वृक्षांची जोपासना मन रमविण्याचे उत्तम साधन आहे.
शाळेत मुलांना पर्यावरण हा विषय असतो. त्यासाठी प्रकल्प असतात. आवारात वृक्ष असतील, तर ते पुस्तके अथवा इंटरनेटवरून माहिती गोळा करण्याऐवजी स्वत: प्रयोग करतील. कार्यानुभव घेऊन मगच अनुमान काढतील. निसर्गातील विविध अन्नसाखळ्यांची माहिती या झाडांमुळे आपण पाहू शकतो, मुलांना शिकवू शकतो. निसर्गातील सर्व घटक एकमेकांवर अवलंबून असतात. केवळ एकटय़ाचा विकास होणे ही सर्वथा अशक्य गोष्ट आहे. सर्व सजीव सृष्टी वनस्पतीवर व वनस्पती सजीव सृष्टीवर अवलंबून असतात.
ठाण्यातील ब्रह्मांड सोसायटीत राहणाऱ्या सीमा राजेशिर्के यांनी खिडकीतून दिसणाऱ्या पक्ष्यांचे निरीक्षण, छायाचित्रण सुरू केले. त्यांची नोंद ठेवली. त्यांनी काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. विंडोबर्डिग नावाने त्यांनी लघुपट तयार केला. त्या लघुपटाला पर्यावरण विभागाचा पुरस्कारही मिळाला. ठाण्यातल्याच तारांगण आणि कोरस या सोसायटय़ांनी आवारात ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करून खत निर्मिती करण्याचा प्रकल्प राबविला आहे. परिसरातील झाडांचा पालापाचोळाही न जाळता या खतनिर्मितीसाठी वापरला जातो. पर्यावरणस्नेही जगण्याचा हाही एक उत्तम मार्ग आहे. अभिनेते रमेश देव आपल्या सोसायटीच्या आवारात सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादन घेतात, हे आपण दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांद्वारे पाहिले असेलच. ऋतु कालोद्भव फुले, फळे आरोग्यास हितकारक आहेत. उदा. उन्हाळ्यात पित्त वाढते. त्याच्या शमनासाठी कोकम, जांभूळ सरबत मिळते.
आरोग्याच्या दृष्टीने वनस्पती फारच उपयुक्त आहेत. या वनस्पतींची ओळख सातत्याने होत राहावी आणि त्या आपल्या संग्रही राहाव्यात यासाठी श्रावण-भाद्रपद महिन्यांमध्ये निरनिराळी व्रतवैकल्ये आहेत. निरनिराळ्या देवतांना वाहण्यासाठी वेगवेगळ्या वनस्पती सांगण्यात आल्या आहेत. जसे श्रावणात सोमवारी बेलाची पाने, मंगळवारी जास्वंदीची फुले, शुक्रवारी आघाडा, इ. या सर्व वनस्पती औषधी आहेत. त्यामुळेच व्रतवैकल्यांच्या निमित्ताने माणसाने त्यांच्या सान्निध्यात असावे, हा हेतू आहे. हरितालिकेच्या व्रतात वाहावयाच्या पत्रीमध्ये सर्दीपासून काविळीपर्यंत सर्वसामान्यपणे आढळणाऱ्या सर्व रोगांवर औषधी वनस्पतींचा समावेश आहे. लहान बाळांना देण्यात येणाऱ्या गुठीत अथवा आजीच्या पारंपरिक बटव्यात अनेक औषधी वनस्पती आढळतात. त्यात आले, सुंठ, वावडिंग, सागरगोटा, मुरुडशेंग वेखंड आदी वनस्पती असतात. कृमी तसेच इतर बारीकसारीक आजारांवर ही औषधे उपयुक्त ठरतात.
देवधर्माच्या निमित्ताने पूर्वी आवारात विविध प्रकारची झाडे लावली जात. त्यामुळे जैव विविधताही राखली जात होती. आता आपण अधिक जाणीवपूर्वक या वृक्षवेलींची जोपासना आपल्या आवारात करू शकतो.
व्यक्तीचे शारीरिक व मानसिक आरोग्य ऋतू, आहारविहार आदींवर अवलंबून असते. निरोगी जीवनाविषयीची आयुर्वेदीय व्याख्या जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केली असून त्यात वृक्षवेलींचे महत्त्व अधोरेखित केले आहे. संत तुकारामांनीही ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असे म्हटले आहे. उपलब्ध असलेल्या जागेनुसार आपण आवारात वृक्ष लागवड करू शकतो.
उदा. औषधी वनस्पती- कडुलिंब, बेल, मुरुडशेंग, शेवगा, इ.
सुगंधी वनस्पती- चाफा, बकुळ, सुरंगी, अनंत, पारिजात
वेली- कामिनी, मोगरा, जाई, जुई, कृष्णकमळ.
सुंदर फुलांसाठी- बहावा, ताम्हण, कण्हेर, कांचन,गुलमोहोर, सरळ वाढणारा कैलासपती, अशोक      
झुडुप – कण्हेर, देवचाफा, गौरीचौडी, इ.
या सर्वाच्या सावलीत वाढणारी अबोली, कोकम, ऑलस्पाइससारखी झाडे लावू शकतो. या सर्वात कल्पवृक्ष नारळ एखादा तरी हवाच. केळीचे झाड तर मांगल्याचे प्रतीक. विशेष म्हणजे प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरून आपण आवारातील वृक्षराजी वाढवू शकतो. येत्या पावसाळ्यापूर्वी यातील कोणती झाडे लावायची हे ठरवा. त्यानुसार नियोजन करा.
राजेंद्र भट