अंगात कुर्ता-पायजमा, त्यावर बंदगळा जॅकेट, पायात कोल्हापुरी चपला असा पारंपरिक वेश आता तरुणाईतील विशेष फॅशन बनला आहे. त्यातच आता भर पडलीय ती कपाळावरच्या चंद्रकोरी टिळय़ाची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावरील रुबाब आणि प्रसन्नता वाढवणारा हा चंद्रकोरी टिळा स्वत:च्या भाळी लावण्याचा नवा ‘ट्रेंड’ तरुणांमध्ये रुजत चालला असून पारंपरिक वेशभूषेसोबत हा टिळा आता ‘फॅशन’ची नवी खूण बनू पाहात आहे. त्यामुळेच अलीकडच्या काळात बाजारात असे टिळे कोरून देणारे कारागीर आणि स्वत:लाच कोरता यावे यासाठी तयार साचे यांची चांगलीच चलती आहे.
ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या वेशभूषेवर आधारित ‘फॅशन’ हा ट्रेंड जुना असला तरी त्यातही दिवसेंदिवस नवनवीन भर पडत आहे. कालपरवापर्यंत नऊवारी साडी नेसल्यानंतर त्याला अनुरूप अशी चंद्रकोर कपाळावर रेखाटून घेण्याला महिलावर्गाची पसंती असे. मात्र, आता ही चंद्रकोर पुरुषांच्या ‘फॅशन’मध्येही रुजू लागली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसह आणखी काही ऐतिहासिक महापुरुषांच्या कपाळावर दिसणारी ही चंद्रकोर सध्याच्या
तरुण वर्गालाही आपलीशी वाटू लागली आहे. त्यामुळेच पारंपरिक वेशभूषेवर चंद्रकोरी टिळा आणि डोक्याला फेटा गुंडाळण्याचा ‘ट्रेंड’ वाढत आहे. केवळ चंद्रकोरच नव्हे तर शंकराच्या ‘त्रिपुंड’ आकाराच्या टिळ्याचे आकर्षण तरुणांमध्ये वाढू लागले आहे.
गडदुर्ग संवर्धन क्षेत्रामध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले अजित राणे गेल्या चार वर्षांपासून अशा प्रकारचा टिळा लावतात. ठाण्यात राहणारा मनोज दंत हादेखील नियमितपणे कपाळी चंद्रकोर उमटवतो. आपल्या मित्रांनाही या चंद्रकोरीचे अप्रूप वाटते, असे तो सांगतो. राजकारणात येत असलेली नवी पिढीदेखील चंद्रकोरीच्या आकर्षणापासून दूर नाही. अशा नव्या राजकीय मंडळींसाठी चंद्रकोर ही आपल्या राजकीय भूमिकेचे प्रतीक दाखवणारी निशाणी ठरत आहे. चंद्रकोर साकारण्यासाठी प्रत्येक आकाराचे वेगवेगळे साचे बाजारात उपलब्ध आहेत. आता तर पुरुषांसाठीही चंद्रकोरी टिकल्या बाजारात उपलब्ध होत आहेत.
श्रीकांत सावंत, ठाणे
संग्रहित लेख, दिनांक 21st Feb 2015 रोजी प्रकाशित
पुरुषांच्या भाळी आता चंद्रकोरीचा टिळा
अंगात कुर्ता-पायजमा, त्यावर बंदगळा जॅकेट, पायात कोल्हापुरी चपला असा पारंपरिक वेश आता तरुणाईतील विशेष फॅशन बनला आहे.

First published on: 21-02-2015 at 12:29 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fashion of historical personalities sign