डोंबिवली – काटई बदलापूर छेद रस्त्यावरील खोणी पलावा भागात भरधाव वेगात असलेली एक स्वीफ्ट डिझायर कार गुरुवारी नाल्यावरील रस्त्याला कठडे नसल्याने नाल्यात पडली. या कारमध्ये चालक आणि त्याची लहान मुलगी होते. धावती कार नाल्यात कोसळल्याने कारने दोन पलट्या खाल्ल्या. सुदैवाने या अपघात होऊनही दोघेही सुखरूप होते.

कार नाल्यात कोसळताच परिसरातील नागरिकांनी, व्यापारी, ढाबे मालकांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहनाने पेट घेण्यापूर्वीच वाहनाचा चालक आणि त्याच्या मुलीला सुरक्षितपणे वाहनातून बाहेर काढले. यावेळी कार पलटी झाल्याने वाहनातून इंधन गळती सुरू झाली होती. काही भागातून धूर येणे सुरू झाले होते. नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाहनातील दोघांना सुरक्षितपणे बाहेर काढणे शक्य झाले.

पलावा खोणी भागातील रस्त्यावर एके ठिकाणी असलेल्या नाल्याला संरक्षित कठडे नाहीत. संरक्षित भिंतही बांधण्यात आलेली नाही. त्यामुळे भरधाव वेगात असलेल्या वाहन चालकाचा याठिकाणी वाहनावरील ताबा सुटला किंवा समोरील वाहनाला मागे टाकण्याच्या प्रकारात मागील वाहनाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर पुढे जाण्याच्या स्पर्धेतील वाहन थेट नाल्यात कोसळते. यापूर्वी असे प्रकार या भागात घडले आहेत.

गुरुवारी एक वाहन चालक आपल्या वाहनाने लहान मुलीला घेऊन प्रवास करत होता. नाल्यावरून भरधाव वेगात जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन थेट नाल्यात कोसळले. वाहनाने कोसळताना दोन पलटी खाल्ल्या. अशा परिस्थितीत वाहनातील दोघेही सुरक्षित राहिले.

मागील अनेक महिन्यांपासून स्थानिक रहिवासी नाल्यावरील दोन्ही बाजुला संरक्षित कठडे बसविण्याची किंवा दगडी भिंत बांधण्याची मागणी रस्ते विभागाकडे करत आहेत. पण त्यांच्या मागणीची दखल घेतली जात नाही. मोठी दुर्घटना घडल्यानंतरच या नाल्याला संरक्षित कठडे बसविले जातील का असे प्रश्न नागरिक करत आहे. अनेक अवजड वाहने या रस्त्यावरून धावत असतात अशावेळी भरधाव वेगात एखादे वाहन समोरून आले तर ते थेट नाल्यात कोसळण्याची भीती असते. नेहमीच असे प्रकार या नाल्यावर घडतात, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.

कर्जत, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली परिसरातील अनेक प्रवासी या रस्त्यावरून नियमितपणे वाहनाने जातात. तळोजा भागात जाण्यासाठी अनेक प्रवासी याच रस्त्याचा वापर करतात.