नाश्ता दिला नाही म्हणून संतापलेल्या वृद्ध सासऱ्याने बंदुकीतून गोळी झाडून सुनेची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ठाण्यातील राबोडी भागात गुरूवारी सकाळी हा प्रकार घडला असून या घटनेनंतर फरार झालेल्या सासऱ्याचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे. हा वृद्ध बांधकाम व्यावसायिक असल्याचे पोलिसांकडून समजते. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

सीमा राजेंद्र पाटील असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे तर, काशिनाथ पाटील (७६) असे आरोपीचे नाव आहे. काशीनाथ पाटील हे राबोडी भागातील एका उच्चभ्रू इमारतीमध्ये राहतात. त्यांच्यासोबत पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडेही राहतात. काशीनाथ यांचे त्यांची पत्नी आणि दोन्ही सुनांसोबत जेवण तसेच इतर कारणांवरून सातत्याने खटके उडत असायचे.

गुरुवारी सकाळी नाश्ता दिला नाही म्हणून त्यांचा सीमा (सून ) हिच्यासोबत वाद झाला. त्यावेळी संतापलेल्या काशीनाथ याने सीमावर बंदुकीतून गोळी झाडली. यात ती गंभीर जखमी झाली. यानंतर घरातील मोलकरणीने काशीनाथ यांना दुसऱी गोळी झाडण्यापासून रोखले. हा प्रकार घडला त्यावेळेस घरामध्ये त्यांची पत्नी, दुसरी सून, नातवंडे आणि मोलकरीण होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जखमी झालेल्या सीमा यांना ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गुरुवारी रात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोळी झाडल्याच्या घटनेनंतर काशीनाथ हे फरार झाले. या प्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस काशीनाथ यांचा शोध घेत आहेत.