बदलापूरः मुरबाड विधानसभा मतदारसंघात माजी खासदार कपिल पाटील आणि विद्यमान आमदार किसन कथोरे यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या पसंतीने उमेदवार निवडीच्या नव्या प्रयोगाची अंमलबजावणी गुरुवारी बदलापुरात झाली. यात पदाधिकाऱ्यांच्या यादीत वेगळीच नावे आली. तसेच अनेक पदाधिकाऱ्यांची नावे आली नसल्याने कथोरे समर्थकांनी यादीला विरोध केला. त्यानंतर झालेल्या गोंधळानंतर निरीक्षक गोपाळ शेट्टी यांनी ही प्रक्रिया नव्याने करण्याचे घोषित केले. मात्र लोकसभा निकालानंतर पेटलेला संघर्ष विधानसभा निवडणुकीत पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा निवडणुकीत पराभव झाला. या पराभवाचे खापर पाटील यांनी आमदार किसन कथोरे यांच्यावर फोडले. त्यानंतर कथोरे आणि पाटील यांच्यातील संघर्ष टोकाला गेला. येत्या विधानसभा निवडणुकीत मीही रिंगणात उतरू शकतो असे संकेत पाटील यांनी दिले होते. त्यामुळे कथोरेंच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. त्यानंतर काही दिवस कथोरे आणि पाटील संघर्ष थांबल्याची चर्चा होती. मात्र गुरुवारी बदलापुरात झालेल्या उमेदवार निवड प्रक्रियेदरम्यान पाटील आणि कथोरे यांच्यातील हा वाद पुन्हा उफाळून आल्याचे चित्र होते.

हेही वाचा – ठाणे : गतीमंद मुलीवर सावत्र वडिलांकडून लैंगिक अत्याचार; तर, बहिणीच्या नवऱ्याकडून मारहाण

निरीक्षक गोपाळ शेट्टी आणि जिल्हा संघटक हेमंद म्हात्रे यांच्या उपस्थितीत बदलापूर पूर्वेतील सभागृहात ही प्रक्रिया राबवण्यात येणार होती. यासाठी अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक उपस्थित होते. यावेळी कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांची यादी वाचून दाखवण्यात आली. या यादीतील व्यक्तींना मुरबाड विधानसभेसाठी आपल्या पसंतीच्या तीन उमेदवारांची नावे बंद लिफाफ्यात देणे अपेक्षित होते. मात्र यावेळी वाचून दाखवण्यात आलेल्या यादीत अनेक पदाधिकाऱ्यांची नावेच नसल्याचे समोर आले. तसेच अनेक कथोरे समर्थक पदाधिकाऱ्यांची नावेच यात नव्हती. त्यामुळे कथोरे समर्थकांनी या यादीला विरोध केला. त्यावेळी काही पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली तसेच धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे सभागृहात तणावाचे वातावरण होते. यावेळी कथोरे समर्थकांनी घोषणाबाजी केली. मात्र निरीक्षक गोपाळ शेट्टी यांनी यादी अद्ययावत करून पुन्हा प्रक्रिया करू असे जाहीर केले. त्यानंतर तणाव निवळला. मात्र या घटनेनंतर मुरबाड विधानसभा मतदारसंघात किसन कथोरे आणि कपिल पाटील यांच्यातील वाद आणखी पेटण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

हेही वाचा – डोंबिवलीत डीएनसी शाळा भागात नवरात्रोत्सव मंडळांकडून डेरेदार झाडांवर विद्युत रोषणाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यादीत पाटील समर्थकांचा वरचष्मा

संबंधित यादीत कपिल पाटील समर्थकांचा वरचष्मा असल्याची माहिती कथोरे समर्थकांनी दिली आहे. तसेच भाजपशी संबंधित नसलेले, कथोरे यांचे सक्रिय नसलेले व्यक्ती तसेच काही संघाच्या पदाधिकाऱ्यांचीही नावे या यादीत असल्याची खात्रीलायक माहिती भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिली आहे.