उल्हासनगर: गणेशोत्सव जवळ येत असतानाच मोठ्या मंडळाकडून गणेश मूर्तींची मिरवणूक काढून मुख्य मंडपात नेण्यासाठी लगबग सुरू आहे. अशातच विनापरवाना मिरवणूक काढून सार्वजनिक रस्ते बंद करत वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या गणेश मंडळांवर उल्हासनगर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. रविवारी ऐन सुट्टीच्या दिवशी मिरवणूक काढणाऱ्या उल्हासनगरचा विघ्नहर्ता आणि सेव्हन स्टार गणेश मित्र मंडळ या दोन मंडळाच्या अध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

उल्हासनगर सध्या कोंडीचे केंद्रबिंदू ठरते आहे. शहरातील अरुंद रस्ते, त्यावर पडलेले खड्डे, वळणाच्या रस्त्यांवरती आणि मुख्य रस्त्यावर होणारी बेकायदा पार्किंग अशा विविध कारणांमुळे रस्ता रुंद झाला आहे. त्यात मालाची ने आण करण्यासाठी लहान मोठ्या ट्रक टेम्पो यांची कायमच शहरातल्या रस्त्यावरती लगबग असते. यामुळे अनेकदा वाहतूक कोंडीही होते. शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय सुचवण्यासाठी नुकतीच उल्हासनगर महापालिका आयुक्त यांच्या कार्यालयात विशेष बैठक पार पडली. त्यामध्ये विविध गोष्टींची पूर्तता करण्याचे आवाहन शहर वाहतूक शाखा आणि पालिका अधिकाऱ्यांना दिले. त्यांचे नियोजन अद्याप होऊ शकलेले नाही. मात्र शहरात कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढते आहे.

उल्हासनगर शहर व्यापारी शहर आहे. सण उत्सवाच्या काळात आसपासच्या तालुक्यांसह जिल्ह्यातील अनेक ग्राहक उल्हासनगर खरेदीसाठी येत असतात. व्यापारी ही मोठ्या संख्येने शहरात येत असतात. अशा वेळेस सण उत्सवांच्या काळात उल्हासनगरात कोंडी अधिक वाढते. रविवारी अशीच कोंडी शहरात झाली होती. त्यातच उल्हासनगरच्या कॅम्प एक भागात दोन गणेश मंडळांनी भव्य मिरवणूक काढत वाहतूक कोंडी केली.

उल्हासनगरचा विघ्नहर्ता आणि सेवेन स्टार गणेश मित्र मंडळ या दोन गणेश मंडळांनी गणेश मूर्ती आगमनाची विनापरवाना मिरवणूक काढली. यावेळी सार्वजनिक रस्ते बंद झाले. परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. मिरवणुकीत ढोल ताशे आणि इतर वाद्य वाजवून पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचाही भंग केला, असा ठपका ठेवत उल्हासनगर पोलिसांनी या दोन गणेश मंडळाच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. दरवर्षी अशा मिरवणुकांवर कारवाई केली जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोंडी सोडवा येत्या काळात शहरात नागरिकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. शहरातील रस्ते अजूनही सुस्थितीत होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे कोंडी कायम आहे. रविवारी उल्हासनगरच्या कल्याण बदलापूर राज्य मार्गावर मोठी कोंडी झाली होती. या मार्गावर अनेक चित्रपटगृह, हॉटेल, गॅरेज, चार चाकी वाहने विक्री दुकाने, इलेक्ट्रॉनिक बाजार आणि रुग्णालय आहेत. त्यामुळे या मार्गावर कायमच वाहनांची वर्दळ असते. रस्त्याच्या कडेला दुहेरी पार्किंगही असते. परिणामी वाहनांसाठी एकेरी मार्गीका शिल्लक राहते. त्यातही बेशिस्त वाहन चालक वाहने रेटण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कोंडीत भर पडते. त्यामुळे अशावेळी वाहतूक विभागाच्या पोलिसांची गरज असते. मात्र अनेकदा वाहतूक पोलिस उपस्थित नसतात अशी वाहनचालकांनी तक्रार असते.