ठाणे महापालिकेची ‘फायर अॅलर्ट हॉट लाइन’ यंत्रणा
ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या तिन्ही शहरांमध्ये घडणाऱ्या घटनांची माहिती अग्निशमन दलास तात्काळ मिळावी आणि अग्निशमन यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्याचा प्रतिसाद कालावधी कमी व्हावा या उद्देशातून महापालिका प्रशासनाने ‘फायर अलर्ट हॉट लाइन’ यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ही यंत्रणा बसवणाऱ्यांच्या ठिकाणांवर आग लागताच त्याची माहिती अग्निशमन केंद्रापर्यंत पोहोचेल व अग्निशमन जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचू शकणार आहेत.
ठाणे शहरात बहुतेक रस्ते अरुंद आहेत. तसेच गृहसंकुलांच्या परिसरातील रस्त्यांवर वाहने उभी असतात. यामुळे गृहसंकुले तसेच व्यावसायिक संकुलांमधील आग विझविण्याकरिता आलेल्या अग्निशमन वाहनास तिथेच अडकून पडावे लागत असल्याचे अनेक घटनांमधून उघड झाले आहे. याशिवाय, काही वेळेस एखाद्या घटनेची माहिती उशिरा मिळाल्याने अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहोचत नाही. या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने ‘फायर अलर्ट हॉट लाइन’ यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या यंत्रणेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यावसायिक आस्थापनांना सुमारे आठ हजार रुपये भरून महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे नोंदित व्हावे लागेल. नोंदित झालेल्या व्यावसायिकांकडे स्मोक डिटेक्टरसारख्या यंत्रणा बसविल्या जातील. आग लागताच यासंबंधीची माहिती अग्निशमन दलासही तात्काळ मिळू शकेल.
अशी असेल ही यंत्रणा..
* ‘फायर अलर्ट हॉट लाइन’ या यंत्रणेसाठी नोंदित होणाऱ्या ग्राहकांकडे स्मोक डिटेक्टर व दूरध्वनी बसविण्यात येणार आहे.
* आग लागताच स्मोक डिटेक्टर सुरू होणार असून आगीचा संदेश फोनद्वारे अग्निशमन नियंत्रण कक्ष आणि संबंधित जागामालकांना मिळणार आहे.
* अग्निशमन दलास तात्काळ संदेश मिळाल्याने तिथे मदत पोहोचविणे शक्य होणार आहे. त्यामुळे त्यांचा घटनास्थळी पोहोचण्याचा प्रतिसाद कालावधी कमी होणार आहे.
* विशेष म्हणजे या यंत्रणेमुळे घटना घडलेल्या ठिकाण मालकांचे नाव, पत्ता, शेजाऱ्यांचा फोन क्रमांक अशी संपूर्ण माहिती मिळणार आहे.
* याशिवाय, विविध भागांतील आपत्कालीन परिस्थितीविषयीही माहिती मिळणार आहे.