डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील पारसमणी चौकातील किनारा हाॅटेल पाठीमागील मोकळ्या जागेतील भंगार सामानाला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. मध्यवर्ति वस्तीत अचानक आगीचे लोळ आणि धूर पसरल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट पसरली. पालिका अग्निशमन विभागाला ही माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.
पारसमणी चौक हा डोंबिवली पूर्वेतील मध्यवर्ती दाट वस्तीचा भाग आहे. या भागात बाजारपेठ, खासगी आस्थापना दुकाने आहेत. अनेक नवीन इमारतींची कामे या भागात सुरू आहेत. हाॅटेल किनारा पाठीमागील भागात एक अरूंद बोळ आहे. या भागाता एका कोपऱ्याला हातगाड्या, काही भंगार सामान ठेवण्यात आले होते. दुपारची वेळ असल्याने काही दुकानदारांनी दुकाने भोजन करण्यासाठी बंद ठेवली होती. दुपारच्या वेळेत शांतता असताना अचानक आग म्हणून मोठ्याने ओरडा सुरू झाला. पादचाऱ्यांना रस्त्यावर एका बोळात आग लागल्याचे समजताच त्यांनी परिसरातील नागरिकांना, दुकानदारांना सावध राहण्याच्या सूचना केल्या. आगीने तात्काळ रौद्ररूप धारण केले. धुराचे लोट पसरले. जळाऊ साहित्य भंगारात असल्याने आगीने तात्काळ पेट घेतला.
आजुबाजुच्या इमारतींमधील रहिवासी आगीचे रौद्ररूप पाहून घाबरले. परिसरातील काही रहिवाशांच्या घरात धूर पसरला. आग आपल्या इमारतीकडे पसरते की काय या भीतीने आजुबाजुच्या इमारतींमधील रहिवाशांनी इमारतीमधून बाहेर पडणे पसंत केले. कल्याण डोंबिवली पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना ही माहिती देण्यात आली. डोंबिवली अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी विलंब न लावता. तात्काळ आगीवर पाण्याची फवारणी करून आगीवर नियंत्रण मिळवले. आग विझवल्यानंतर आजुबाजुचे दुकानदार, परिसरातील रहिवाशांनी सुस्कारा सोडला.
आगीचे नक्की कारण समजू शकले नाही. भंंगार साहित्यात कोणी तरी जळती काडी टाकली असण्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तवण्यात येत आहे. या आगीची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली पालिकेच्या फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी घटनास्थळी सहकाऱ्यांसह धाव घेतली. या भागात पसरलेले इतर भंंगार साहित्य हटविण्याच्या सूचना त्यांनी स्थानिकांना केल्या.
