सर्वच फटाक्यांच्या आवाजाची पातळी १२५ डेसिबलहून मोठी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवाळीतील फटाक्यांच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या परीक्षणादरम्यान सर्वच फटाक्यांच्या आवाजाची पातळी १०० डेसिबल ते १२५ डेसिबल इतकी मोठी आढळून आली आहे. काही फटाक्यांचा आवाज कमी असला तरी त्यातून निघणाऱ्या धुरामुळे मोठय़ा वायुप्रदूषणाची नोंद या परीक्षणादरम्यान करण्यात आली आहे. १४५ डेसिबल इतक्या आवाजाच्या फटाक्यांना मान्यता असल्यामुळे यापैकी कोणत्याही फटाक्यांवर र्निबध लादले जाणार नाहीत, असा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाही दिवाळीत फटाक्यांचा आवाज कर्णकर्कशच रहाणार आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने मागणी करूनही फटाक्यांमधील रसायनिक घटक, स्फोटके यांचा तपशील देण्यास ९० टक्क्यांहून अधिक उत्पादक टाळाटाळ करत असल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे दिवाळीदरम्यान फटाके वाजवताना अपघात होण्याची भीती उल्हासनगर येथील हिराली संस्थेकडून व्यक्त करण्यात आली आहे. दिवाळीदरम्यान होणारे ध्वनिप्रदूषण आणि वायुप्रदूषणाची तीव्रता वर्षांच्या इतर दिवसांच्या तुलनेत कमालीची वाढलेली दिसून येते. या विरोधात पर्यावरणस्नेही आवाज उठवत असले तरी कायदेभंग करून प्रमाणापेक्षा जास्त आवाजाचे फटाके वाजवण्याकडे नागरिकांचा कल दिसून येतो. या फटाक्यांचे परीक्षण प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्याची आवश्यकता असताना काही ठिकाणी हे परीक्षण केले जात नव्हते. उल्हासनगर येथील हिराली फाऊंडेशन ही संस्था गेली चार वर्षांपासून ध्वनिप्रदूषणाविरोधात काम करत आहे. या संस्थेकडून कल्याण प्रदूषण नियंत्रण    मंडळाकडे फटाके परीक्षणासाठी सतत पाठपुरावा केला जात होता. या पाश्र्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी उल्हासनगरच्या सेंट्रल मैदानामध्ये फटाक्यांच्या आवाजाची तपासणी केली. यावेळी तपासणीसाठी  अ‍ॅटम बॉम्ब, सुतळी बॉम्बसह लहान व रंगीत फटाक्यांचा समावेश होता. या फटाक्यांपैकी सुमारे ९० टक्के फटाक्यांच्या वेष्टणावर कोणत्याही प्रकारच्या घटकापासून हे फटाके बनवण्यात आले असल्याचा तपशील देण्यात आला नव्हता. आवाजाची पातळी आणि धोक्याचा इशाराही फटाक्यांच्या वेष्टणावर नसल्यामुळे नागरिकांना हे फटाके वाजवून अपघाताला तोंड देण्याची शक्यता जास्त असल्याचे हिराली संस्थेच्या सरिता खानचंदानी यांनी सांगितले.

सर्वेक्षणातील निरीक्षणे

* परीक्षणादरम्यान वाजविण्यात आलेल्या फटाक्यांचा आवाज १०० ते १२४ डेसिबल इतका प्रचंड होता. मानवी कानाची क्षमता विचारात घेता हा आवाज मोठा असून त्यामुळे बहिरेपण येण्याची शक्यता असते.

* यापैकी काही आवाज नसलेल्या फटाक्यांमधून मोठय़ा प्रमाणात धूर निघत असल्यामुळे वायुप्रदूषणाचा धोका अधिक होत असल्याचे दिसून आले.

* महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने उघडय़ा मैदानावर फटाक्यांचे परीक्षण केले, मात्र सोसायटी, घराचा परिसर आणि इतर अरुंद जागेत फटाके फोडल्यास त्याचा आवाज क्षमतेपेक्षा अधिक होण्याची शक्यता असते.

* एकाच वेळी अनेक फटाके एकाच परिसरात वाजवल्यासही आवाजाची पातळी कमालीची वाढते. मैदाने आणि जागा नसल्याने असे फटाक्यांचा आवाज १४५ डेसिबलपेक्षाही जास्त होत असतो. आवाजाची पातळी १०० डेसिबलपेक्षाही कमी करण्याची गरज आहे.

मानवी आरोग्य बिघडवणाऱ्या फटाक्यांच्या निर्मितीवर बंदी आणण्याची आवश्यकता असून त्यासाठी लढा उभारण्याची गरज आहे. मात्र फटाका उत्पादकांच्या लॉबिंगमुळे सरकारी यंत्रणा यासंदर्भात कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. शासनाने जागृती करण्यापेक्षा उत्पादनावर बंदी घातल्यास त्याचा फायदा अधिक होऊ शकेल.

– डॉ. महेश बेडेकर, जनहित याचिकाकर्ते

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Firecracker sounds rock diwali festival this year
First published on: 14-10-2016 at 01:38 IST